
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी वडील, भावावर गुन्हा दाखल
चाकण, ता. 26 : निघोजे (ता. खेड) येथील एका महिलेला प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या करण्यासाठी वडील व भावाने मारहाण करीत धमकी दिली. अशोक संतोष सोनवणे (वय ७०), गुणवंत अशोक सोनवणे (वय ३७, दोघेही रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकाची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेच्या आईने स्वतः खरेदी केलेली प्रॉपर्टी बक्षीस पत्राने फिर्यादीला दिली व त्यांनी काढलेल्या एलआयसीवर वारसदार म्हणून महिलेचे नाव लावलेले आहे. महिलेच्या आईचा २०२२ मध्ये मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर वडील अशोक व भाऊ गुणवंत हे महिलेच्या घरासमोर आले. एलआयसीच्या कागदपत्रांवर तसेच प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या कधी करणार, अशी विचारणा करीत महिलेला शिवीगाळ केली. घरात शिरत त्यांना धक्काबुक्की करून घरातील साहित्य फेकून दिले. तसेच प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.