चाकण वनविभागाच्या हद्दीत साकारणार ज्ञानराई वन उद्यान

चाकण वनविभागाच्या हद्दीत साकारणार ज्ञानराई वन उद्यान

चाकण, ता. १८ : चाकण -आळंदी मार्गावरील चाकण (ता. खेड) वनविभागाच्या हद्दीत सुमारे पंचवीस हेक्टरवर शासनाच्या निधीतून तसेच विविध कंपन्याच्या सीएसआर फंडातून ज्ञानराई वनउद्यान इको टुरिझम प्रकल्प साकारण्यात येणार आहे. आळंदीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर तसेच देहूपासून अठरा किलोमीटर अंतरावर चाकण वनविभागाच्या हद्दीत एक हजार हेक्टर मधून २५ हेक्टर जागेवर सध्या प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

आळंदी, देहू येथे येणारे भाविक, वारकरी महाराष्ट्रातील पर्यटक, शेतकरी यांच्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, अशी माहिती चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी योगेश महाजन यांनी दिली. चाकणच्या वन विभागाच्या हद्दीत पांडव कालीन जलकुंड रोटाई तळे परिसरात ज्ञानराई उद्यान प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी शासनाचा निधी तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून या प्रकल्पाचे काम होणार आहे. राज्याचे राज्यफुल ''ताम्हण'' फुलाच्या आकारासारखा या प्रकल्पाचा आराखडा असणार आहे.

पर्यटकांसाठी सोलार ट्री,सोलार दिवे, पर्यटकांच्या कार चार्जिंग करण्यासाठी इ चार्जिंग स्टेशन करण्यात येणार आहे. फूड काऊंटर, शॉपिंग काउंटर करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या निवासासाठी रेस्ट हाऊस उभारण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ व वनविभाग यांच्या वतीने ॲग्रो फॉरेस्ट इनोव्हेशन अँड रिसर्च सेंटर उभे करण्यात येणार आहे.

संतांचे विलोभनीय देखावे
पांडवकालीन जलकुंड रोटाई तळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या तळ्यात पाण्याची उडती कारंजी करण्यात येणार आहेत. आळंदी, देहूतील संतांच्या प्रतिकृती त्यांच्या जीवनातील क्षण असलेले देखावे उभारण्यात येणार आहे. बिबट्याचे व्हिडिओ दाखवून जनजागृती करण्यासाठी वन्यजीव जागृती केंद्र करण्यात येणार आहे.

ज्ञानराई वनउद्यान हा प्रकल्प येत्या दोन वर्षात साकारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर तसेच शासनाचा निधी व कंपन्यांच्या सीएसआर फंडातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प वनविभागाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
- योगेश महाजन, चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी

प्रकल्पात यांचा असेल समावेश
१. सायन्स पार्क, तरुणांसाठी फिटनेस पार्क,
२. हिरव्या गवत तसेच वेलीपासून बनविलेली विविध प्रकारचे प्राणी
३. विविध वन उद्याने, रॉक गार्डन, वयोवृद्धांसाठी नानां, नानी पार्क
४. मुलांसाठी बाल उद्याने, विविध फुलपाखरे असलेली बटरफ्लाय गार्डन
५. वनस्पती उद्यान, विविध रोपवाटिका, योगाची माहिती देणारी योग उद्याने,
६. निसर्ग पायवाटा, सुरक्षिततेसाठी सभोवताली उंच टॉवर,
७. वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमची निर्मिती


05646

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com