खेडमधील विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश

खेडमधील विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश
Published on

चाकण, ता. २८ : ‘‘खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत, तसेच प्रलंबित प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मतदारसंघाच्या अनेक प्रलंबित विकासकामे, समस्यांची माहिती त्यांना दिली. त्यावर त्यांनी प्रलंबित विकासकामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते यांनी दिली.
मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानके बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले (कार पार्किंग) वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
या बैठकीला आमदार दिलीप मोहिते, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, डॉ. के. एच. गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी; तसेच पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी, कार्तिकी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी वाहनतळाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आळंदीतील एसटी महामंडळाच्या जागेवर बसस्थानकाची इमारत बांधून त्यावर रॅम्पच्या सुविधेसह कार पार्किंग, वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा.’’

चाकण- आळंदी महापालिकेचा प्रस्ताव
चाकण शहराच्या विकासकामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने सोयीसुविधा नागरिकांना देण्यात नगरपरिषदेला मर्यादा येत आहे. नागरीकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी पुढील काळात चाकण- आळंदी महानगरपालिका करावी, असाही प्रस्ताव शासनाचा आहे. चाकण, आळंदी ही दोन्ही शहरे व परिसराच्या लोकसंख्येची गणना करून त्याबाबत शासन निर्णय घेण्यात येणार आहे.’’

राजगुरुंच्या स्मारकासाठी आराखडा
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू स्मारकाबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे खेड पंचायत समितीची जुनी जागा ती जागाही शासन ताब्यात घेणार आहे.’’

न्यायाधीशांच्या निवासस्थानाला जागा
राजगुरुनगर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या निवासस्थानाला जलसंपदा विभागाची ८० गुंठे जागा देण्यास मान्यता देण्यात आली. ही जागा कृष्णा खोरे महामंडळाची असून, वीस लाख रुपये महामंडळाकडे भरून शासनाला जागा ताब्यात घेण्यासही मान्यता देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com