चाकणची कोंडी फोडण्यासाठी अखेर मुहूर्त?

चाकणची कोंडी फोडण्यासाठी अखेर मुहूर्त?

Published on

चाकण, ता. १२ : पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरसावले आहेत. येत्या २५ सप्टेंबरला या कामाच्या निविदा खुली केली जाईल. नंतर या कामाची वर्क ऑर्डर संबंधित कंपनीला दिली जाईल आणि काम सुरू होईल, असे आदेश गडकरी यांनी दिले असल्याचे महामार्ग कामाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी सांगितले.

पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली होती; परंतु भूमी अधिग्रहण १०० टक्के न झाल्यामुळे कामाची प्रक्रिया रेंगाळली होती. पुणे-नाशिक महामार्गाचे खेड तालुक्यात सात टक्के भूमी संपादन प्रलंबित होते. या भू संपादनाची जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे. सोमवारी (ता. ११) पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मेदगे यांनी भेट घेतली व चर्चा केली, त्यावेळी गडकरी यांनी वरील आदेश दिल्याचे मेदगे यांनी सांगितले. पुणे-नाशिक महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून काम रेंगाळले आहे हे काम व्हावे यासाठी अनेक आंदोलने झालेली आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण औद्योगिक वसाहतीचा मोठा भार आहे. औद्योगिक वसाहत असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे, तो सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी असे मेदगे यांनी सांगितले. याभेटीप्रसंगी पुणे- नाशिक महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

चौकट : ...त्यानंतर गडकरींचे कामाकडे विशेष लक्ष
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच चाकण येथील वाहतूक कोंडीबाबत पाहणी दौरा केला होता. पाहणी दौऱ्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे-नाशिक महामार्गाचे तसेच चाकण- तळेगाव-शिक्रापूर मार्गाचे काम होण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदने दिलेली होती, त्यानंतर गडकरी यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिलेले आहे.

गेली अनेक वर्षे रेंगाळलेला प्रश्न मंत्री गडकरी यांनी मार्गी लावला आहे. नाशिक फाटा ते चांडोली यादरम्यान सुमारे ३० किलोमीटर अंतराचा (एलिव्हिटेड) उन्नत मार्ग होणार आहे. यामध्ये आठ (पदरी) लेनचा उन्नत मार्ग तसेच जमिनीवर आठ पदरी असा मार्ग होणार आहे. १६ पदरीचा हा मार्ग होणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल.
-दिलीप मेदगे, समन्वयक, पुणे-नाशिक महामार्ग

Marathi News Esakal
www.esakal.com