चाकणला टोमॅटोचा बाजारभाव वधारला

चाकणला टोमॅटोचा बाजारभाव वधारला

Published on

चाकण, ता.२४ : चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता.२४) नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. टोमॅटोला पावसामुळे मागणी रोडावली. परंतु बाजारभाव वाढून ते प्रतिकिलोला १८ ते ३० रुपये राहिले. भावात प्रतिकिलोला दहा रुपयांनी वाढ झाली. किरकोळ बाजारात टोमॅटो पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला. गणेशोत्सवामुळे उपवासासाठी रताळ्याला ग्राहकांची मागणी आहे.

कर्नाटक राज्यातून बेळगावी रताळ्याची दहा टन आवक झाली. घाऊक बाजारात रताळ्याला तीस ते पस्तीस रुपये भाव मिळाला. उत्तर प्रदेश, आग्रा, मध्यप्रदेश, इंदोर, गुजरात येथून सुमारे दोन हजार क्विंटल बटाट्याची आवक झाली. बाजारात प्रतिकिलोला चौदा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
बाजारात दीड हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याची आवक दिवसेंदिवस घसरत आहे. नवा कांदा बाजारात येण्यास अजून एक महिन्याचा कालावधी आहे. कांद्याला प्रतिकिलोला किमान बारा रुपये ते कमाल सतरा रुपये भाव मिळाला. कांद्याचे भाव गडगडत असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे.

महात्मा फुले बाजार आवारात हिरव्या मिरचीची दिल्लीतून तसेच राज्यातील बुलडाणा व इतर भागातून सुमारे ५० टन आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिकिलोला किमान ३० ते कमाल ६० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात हिरवी मिरची ८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
फळभाज्यांचे बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति किलो) : टोमॅटो : १८-३०, कारली :१९-३२, दोडका : १५ -३०, भेंडी : १२-३०, गवार : ३०-५०, कोबी : ४-६, फ्लॉवर : १०-१८, वांगी : १५-३०, काकडी : १५, वालवर : २०-४०, हिरवी मिरची : ३०-६०, दुधी भोपळा : १०-१२, शेवगा: ३०-६०, ढोबळी मिरची : २०-४०, चवळी : १५-३०, हिरवा वाटाणा : ४०-८०, गाजर : २०-४०.


रिमझिमीमुळे शेतकरी व्यापाऱ्यांचे नुकसान
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकच्या सुमारे एक लाख वर जुड्यांची आवक झाली. कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक ची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तसेच मागणी कमी राहिल्याने तसेच पावसाची रिमझिमही बाजारात सुरू झाल्याने एका जुडीला फक्त पाच रुपये बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या बाजारात फळभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे हे वास्तव आहे.

09129

Marathi News Esakal
www.esakal.com