
चाकण, ता. १४ : येथील औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे (ता. खेड) गावच्या हद्दीतील कंपनी रासायनिक सांडपाणी ओढ्यात, नाल्यात सोडत होती. त्यामुळे अठरा मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे कार्यालयाने या कंपनीवर कायदेशीर कारवाई करून ती बंद करण्यात यावी. असा अहवाल मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर दोषी कंपनीवर क्लोजर (वीज, पाणी पुरवठा, उत्पादन बंद करणे) ची कारवाई करण्यासाठी मुंबई येथील कार्यालयाला पुण्यातील कार्यालयाने सर्व माहिती पाठवली आहे. लवकरच संबंधित कंपनीला क्लोजर नोटीस निघणार आहे. गरीब मेंढपाळाला नुकसान भरपाई मिळेल गोरे यांनी सांगितले.
‘सकाळ’ने उपस्थित केला होता प्रश्न :
‘सकाळ’ने चाकण औद्योगिक वसाहतीत सांडपाण्याचा प्रश्न या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल त्वरित घेतल्याने प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला आहे. जी कंपनी रासायनिक सांडपाणी ओढ्यात, नाल्यात सोडते त्या कंपनीवर कारवाई होणार आहे. त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. तसेच मेंढपाळाला नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे.