चाकण बाह्यवळणाला दिवाळीचा मुहूर्त?

चाकण बाह्यवळणाला दिवाळीचा मुहूर्त?

Published on

चाकण, ता. २१ : पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सारेच वैतागले आहेत. या मार्गाची नव्याने कामे होत नाहीत .परंतु चाकण बाहेरील बाह्यवळण मार्ग करावेत ही मागणी अनेक वर्षाची आहे. या मागणीला व पाठपुराव्याला यश आलेले आहे. ‘पीएमआरडीए’ ने चाकण शिक्रापूर मार्गाला जोडणारा व पुणे-नाशिक मार्गाला जोडणारा चाकणच्या बाहेरून कडाचीवाडी ते मेदनकरवाडी हा बाह्यवळण मार्ग करण्याचे ठरविले आहे. या बाह्यवळण मार्गात ज्या जमिनी संपादित होणार आहेत त्याची मोजणी ही दिवाळी अगोदर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीचा मुहूर्त या मार्गाला मिळणार आहे असे चित्र आहे.
चाकण (ता. खेड) येथील माणिक चौक व तळेगाव चौकातील तसेच चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव मार्ग, पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कडाचीवाडी ते मेदनकरवाडी असा बाह्यवळण मार्ग सुमारे अडीच किलोमीटरचा होणार आहे. तो मार्ग पुणे-नाशिक महामार्गाला जोडून पुढे नाणेकरवाडी, खराबवाडी हद्दीतून औद्योगिक वसाहतीतील मार्गाला जोडणार आहे. त्यामुळे तळेगाव मार्गाने येणारी वाहतूक या मार्गाने शिक्रापूर रस्त्याला येऊ शकते तसेच शिक्रापूर मार्गाने आलेली वाहतूक या मार्गाने तळेगाव मुंबईकडे जाऊ शकते .त्यामुळे या वाहतुकीचा विशेषतः: अवजड वाहतुकीचा ताण चाकण शहरात येणार नाही, त्यामुळे रस्ते खुले होतील. पीएमआरडीएने या मार्गाच्या कामासाठी निधी मंजूर केलेला आहे. या मार्गातील जमिनीचे संपादन थेट खरेदीने होणार आहे. त्यानंतर मार्गाचे काम सुरू होणार आहे. या मार्गात काही अंतर हे डांबरीकरणाचे राहणार आहे तर काही अंतर हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे राहणार आहे. हा मार्ग कडाचीवाडी, मेदनकरवाडीच्या ओढ्याच्या बाजूने जातो. हा मार्ग ३६ मीटर रुंदीचा आहे तसेच त्याला पर्यायी मार्गही असणार आहेत. हा मार्ग उंचीवर असणार आहे त्यामुळे वाहतूक थांबणार नाही ती सलग पुढे जाणार आहे.

या बाह्यवळण मार्गाच्या कामासाठी पीएमआरडीए ने तसेच जिल्हाधिकारी यांनी मोठी गती दिलेली आहे. भूसंपादन अधिकारी म्हणून खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच जमिनीची मोजणी होईल त्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जातील. शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन थेट खरेदीने होणार आहे. त्यामुळे भूसंपादन लवकर होईल.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

चाकण बाह्यवळण मार्गाच्या हद्दीत येणाऱ्या जमिनींची मोजणी करण्यात येणार आहे. या मोजणीसाठीची रक्कम पीएमआरडीए भरणार आहे. येत्या काही दिवसांत मोजणीच्या नोटिसा शेतकऱ्यांना येतील. त्यानंतर मार्गाच्या हद्दी कायम केल्या जातील. त्यानंतर जमिनीचे दर ठरविण्याबाबत शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लागेल.
- अनिल दौंडे, प्रांताधिकारी

१९ एकर जागा संपादित होणार
चाकणचा बाह्यवळण मार्ग कडाचीवाडी ते मेदनकरवाडी या गावातून जातो. कडाचीवाडी येथील सुमारे सहा एकरावर जमीन संपादित होणार आहे तर मेदनकरवाडी येथील १३ एकरावर जमीन संपादित होणार आहे. या मार्गाचे काम पीएमआरडीने लवकर मार्गी लावावे, अशी मागणी मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर, अप्पासाहेब कड,ॲड. संकेत मेदनकर, संभाजी मेदनकर, अमित मेदनकर, गणेश भुजबळ, हेमंत भुजबळ, नवनाथ भुजबळ, किरण कड व इतरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com