माणिक चौकातील अतिक्रमण जैसे थे

माणिक चौकातील अतिक्रमण जैसे थे

Published on

चाकण, ता. २८ : येथील जुन्या पुणे- नाशिक मार्गावरील माणिक चौकातील हातगाडीवाले, पथारीवाले, व्यावसायिकांची अतिक्रमणे काही निघत नसल्याचे दिसत आहे. अतिक्रमण धारकांची दहशत सुरू आहे. त्या दहशतीला सारे घाबरतात असे चित्र आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेचे पथक येते, थोडी कारवाई करतेस, मात्र नंतर तसेच निघून जाते. कारवाई करणाऱ्या पथकावर पथारीवाले, व्यावसायिक हातगाडीवाल्यांची दादागिरी सुरूच असते. त्यामुळे नगरपरिषद, पोलिस प्रशासन मात्र निष्प्रभ असल्याचे दिसत आहे.

चाकण (ता. खेड) येथील माणिक चौकात जुन्या पुणे- नाशिक रस्त्यावर बेकायदा पथारीवाले, हात गाडीवाले, व्यावसायिक अगदी रस्त्यावरच बसतात. दोन्ही बाजूने रस्ता दहा, दहा फूट अडवतात. त्यामुळे अवजड वाहनांना रस्ता फक्त १० ते १५ फूटच राहतो. त्यातून अवजड वाहनांनी ये- जा कशी करायची? तसेच, पादचारी, दुचाकी चालकांनी ये- जा कशी करायची? असा प्रश्न वाहनचालक आणि नागरिकांना पडला आहे.
ही बेकायदा अतिक्रमणे काढण्याचे प्रयत्न चाकण नगरपरिषद, नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांच्याकडून होत असले तरी ते निष्प्रभ ठरत आहेत. अतिक्रमण धारकांच्या दादागिरी पुढे, दहशती पुढे सारे निष्प्रभ आहेत. त्यामुळे हा रस्त्यावरचा बाजार नेहमीप्रमाणे सराईतपणे सुरू आहे. माणिक चौक परिसरात सुमारे २०० हातगाड्या आहेत. चाकण बसस्थानकाच्या आवारातही हातगाड्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही अतिक्रमणे बेकायदा आहे. मात्र, यावर कोणीच राजकीय नेता, पदाधिकारी, कार्यकर्ते आवाज उठवत नाही.
दरम्यान, येथील रस्त्यावरील बेकायदा जैसे थे आहे. अतिक्रमणधारकांची दहशत मात्र कायम आहे. यामध्ये पोलिस व नगरपरिषद प्रशासन यांची मात्र तू तू ,मैं मैं चालू आहे.
याबाबत पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम, चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले की, ‘‘चाकण नगरपरिषदेने आमच्याकडे लेखी स्वरूपात पोलिस बंदोबस्त मागितला पाहिजे. तसेच, आम्हाला फोन करून संपर्क केला तरी आम्ही बंदोबस्त देऊ.’’

रस्त्यावरील बाजार जो बसतो त्यामधील अतिक्रमण करणाऱ्या हातगाडीवाले, व्यावसायिक, पथारीवाले यांची अतिक्रमणे नगरपरिषदेने काढण्याचा प्रयत्न दोन दिवसापूर्वी केलेला आहे. मात्र, पोलिस बंदोबस्त नसल्याने अतिक्रमणे काढली जात नाही.
- डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद

हातगाडी, पथारीवाल्यांचे दर ठरलेले
एका हातगाडी वाल्याला, तसेच पथारीवाल्याला दर दिवसाला ३०० ते ५०० रुपये हप्ता म्हणून द्यावा लागतो. असे पैसे घेणारे काही लोक आहेत. त्यांच्या टोळ्या आहेत, तसेच त्यांच्या दहशतीवर ही अतिक्रमणे वाढलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे पोलिस प्रशासन, तसेच नगरपरिषद प्रशासन नाणेकरवाडी ग्रामपंचायत निष्प्रभ झाली आहे का? असा सवाल नागरिकांचा, कामगारांचा व इतरांचा आहे.

09415

Marathi News Esakal
www.esakal.com