
चाकण, ता.१३ : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. १३) नव्या बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. नव्याने काढणी केलेल्या बटाट्याची सुमारे अडीच टन क्विंटल आवक झाली. त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला पंधरा रुपये बाजारभाव मिळाला. मिळालेल्या उत्पन्नातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. आग्रा, गुजरात तसेच इंदोर बटाट्याला प्रतिकिलोला वीस रुपये बाजारभाव मिळाला.
बाजारभाव कमी असल्यामुळे बटाट्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, असे बटाटा उत्पादक, शेतकरी तुकाराम कलवडे
यांनी सांगितले. दरम्यान, मध्यप्रदेशातून डांगर भोपळ्याची सुमारे दहा टन आवक झाली. मध्यप्रदेश राज्यातून भुईमुगाच्या ओल्या शेंगांची सुमारे दहा टन आवक झाली. त्यास प्रतिकिलोला ५० ते ६० रुपये बाजारभाव मिळाला. किरकोळ बाजारात मात्र भुईमुगाच्या ओल्या शेंगा ७० ते १०० रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहेत. राज्यातील शेतातील फळभाज्या व भाजीपाला पावसाने गेल्याने बाजारात फळभाज्या व भाजीपाल्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे तसेच मागणी अधिक आहे.कोथिंबीर , मेथी, शेपू, पालक च्या सुमारे एक लाख वर जुड्यांची आवक झाली. मेथीच्या जुडीला ३० तर कोथिंबिरीच्या जुडीला २५ रुपये बाजारभाव मिळाला. पालक, शेपूच्या एका जुडीला १० ते १५ रुपये भाव मिळाला.
हिरवा वाटाणा किरकोळ बाजारात दोनशे रुपये प्रतिकिलोने तसेच गावरान वालाच्या शेंगा, गवार दोनशे रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहेत. वाढलेले भाव मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री देत आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला भाजीपाला, फळभाज्या खरेदी करणे हाताबाहेर गेले आहे असे चित्र आहे.
बाजार आवारात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातून हिरव्या मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली. किरकोळ बाजारात मिरची ६० ते ८० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. प्रतिकिलोला दहा रुपयांनी घट झाली. कांद्याची सुमारे तीन हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला दहा ते पंधरा रुपये भाव मिळाला.
फळभाज्यांचे बाजारभाव पुढील प्रमाणे (प्रतिकिलो) : टोमॅटो : १५-१८, कारली : २०-४०, दोडका : ३०-५०, भेंडी : ४०-५०, गवार : ८०-१२०, कोबी : ७०-१२०, फ्लॉवर : ८० -१४०, वांगी : ४०-६०, हिरवी मिरची : ३०-४०, दुधी भोपळा : १०-१५, शेवगा : ६०-१००, ढोबळी मिरची : ३०-५०, काकडी : १८.