चाकणमध्ये रस्त्यावर धुळीचे लोट
चाकण, ता. १५ : येथील पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांचा, नागरिकांचा तसेच कामगार, प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न या धुळीमुळे निर्माण झाला आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते हे खड्डे मुरमाने बुजविले. त्या मुरूम, मातीमुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. ही धूळ येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इतरत्र उडत आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना या धुळीचा सामना करावा लागत आहे. या धुळीमुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे; परंतु याकडे एमएसआयडीसीचे अजिबात लक्ष नाही असा आरोप नागरिक, कामगार, प्रवाशांचा आहे. येताना जाताना दुचाकी चालकांना तोंडाला मास्क लावावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाणेकर यांनी सांगितले की," तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या मार्गावरून औद्योगिक वसाहतीतील विविध कंपनीची अवजड वाहने कंटेनर ट्रेलर ये-जा करतात. त्यामुळे ही अवजड वाहने येताना जाताना मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडतात. त्यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, दुचाकी चालक यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे."
09710

