नवले पुलाच्या दुर्घटनेची चाकणमध्ये पुनरावृत्तीचा धोका
चाकण, ता. १५ : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या भीषण कंटेनर दुर्घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असताना चाकण परिसरातही अशीच दुर्घटना कधीही घडू शकते, अशी भीती नागरिक आणि कामगार व्यक्त करत आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीतील अनियंत्रित कंटेनर व ट्रेलर वाहतूक दिवसेंदिवस मृत्यूचे सावट बनत आहे.
चाकण परिसरातून दररोज तब्बल ५० हजारांहून अधिक कंटेनर, ट्रेलर, टँकर यांची वर्दळ सुरू असते. त्यापैकी अनेक जण भरधाव वेगात, नियम धाब्यावर बसवून, तर काही चालक मद्यप्राशन करून जीवघेणी वाहतूक करतात. परिणाम सातत्याने अपघात आणि निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. नवले पुलावरील दुर्घटनेत जसा कंटेनर अनियंत्रित होऊन अनेक वाहने चिरडली, तसाच थरार चाकण-शिक्रापूर तसेच चाकण-तळेगाव मार्गावर पाहायला मिळतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी माणिक चौकातील हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत भरधाव कंटेनरने दुचाकीवरील दोन महिला आणि एका लहान मुलीला उडवले होते. त्यात एका महिलेचा आणि चिमुरडीचा मृत्यू झाला होता. इतकेच नव्हे तर अपघातानंतर पळ काढताना कंटेनरचालकाने पोलिसांच्या वाहनासह इतर वाहनांनाही धडक दिली. हा मृत्यूचा उन्माद थांबवण्यासाठी पोलिसांनी शिक्रापूरजवळ कंटेनर थांबवावा लागला होता.
अतिक्रमणाबाबत केला काणाडोळा?
जुना पुणे-नाशिक मार्ग आणि चाकण–शिक्रापूर रस्ता माणिक चौकाजवळ एकत्र येतो. येथे रस्ते अरुंद, त्यात पथारीवाले आणि हातगाड्या यांच्या अतिक्रमणांमुळे मोठे अवजड कंटेनर वळणेच कठीण. परिणामी दररोज जीवघेणे प्रसंग आणि भयावह अपघात घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या चाकण नगरपरिषद व नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने अतिक्रमणाबाबत काणाडोळा केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
...तरीही प्रशासन जागे होत
नवले पुलाची दुर्घटना हादरवून गेल्यानंतरही प्रशासन जागे होत नसल्याचे चित्र चाकणमध्ये दिसत आहे. “माणिक चौकातील अतिक्रमण तत्काळ हटवावे; कंटेनर-ट्रेलर चालकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा नवले पुलासारख्या घटना चाकणमध्ये दररोज घडतील,” असे मागणी नागरिकांचे म्हणणे आहे.
09712

