चाकणला शिवसेना- राष्ट्रवादीत कॉंटे की टक्कर

चाकणला शिवसेना- राष्ट्रवादीत कॉंटे की टक्कर

Published on

हरिदास कड
चाकण, ता. २५ : चाकण (ता. खेड) नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २५ जागांसाठी व जनतेतून थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. त्यातील नगरसेवकपदाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत आहे. नगरसेवकपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व भाजपने मोजक्याच जागेवर उमेदवार दिले आहेत. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व कॉंग्रेस पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
चाकण ‘ब’ वर्गाची नगरपरिषद आहे. या नगर परिषदेची स्थापना सन २०१५मध्ये झालेली आहे. या नगरपरिषदेत २०१५ ते २०१९ या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे वर्चस्व नगरपरिषदेवर होते. त्यावेळी शिवसेनेला ९ जागा मिळाल्या होत्या. सात जागा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्या होत्या. सहा अपक्ष होते. एक जागा भाजपने कशीबशी जिंकली होती. मागच्या निवडणुकीत अपक्ष बोलेल तसे चालत होते. अपक्षांना नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची, तसेच उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पाच वर्षे विरोधी बाकावर बसली.
चाकणमध्ये नगरसेवकपदाच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे प्रभाग क्रमांक पाचमधून बिनविरोध निवडून आले आहेत, तर प्रभाग क्रमांक सातमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुयोग शेवकरी, तर प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भुजबळ हे बिनविरोध निवडून आले आहेत. येथे नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा यांना ठाकरे यांच्या शिवसेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नगराध्यपदासाठी येथे दोनही शिवसेना एकत्र असल्याचे वेगळे समीकरण पाहावयास मिळत आहे. चाकणचे माजी उपसरपंच व भाजपचे नेते कालिदास वाडेकर यांची सून भाग्यश्री विवेक वाडेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी घेतलेली आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी संगीता आनंद गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती आनंद उर्फ बाळासाहेब गायकवाड हे चाकण शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. भाजपच्या हर्षला चौधरी- देशमुख याही नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. त्यांचे पती मनोज देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते आहेत.
खेड तालुक्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आहेत. परंतु, चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे अस्तित्व मोठे जाणवत नाही. भाजप व ठाकरेंच्या शिवसेनेचे मोजके उमेदवार उभे आहे. मतदार त्यांना किती महत्त्व देतात, हेही महत्त्वाचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणारच, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नितीन गोरे यांनी शिवसेनेचा झेंडा चाकण नगर परिषदेवर फडकवणार, असा निर्धार केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अस्तित्व मात्र येथे जाणवत नाही. यावेळेच्या निवडणुकीत अपक्षांची चलती कमी दिसत आहे. त्यामुळे नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकतो की राष्ट्रवादी कॉंग्रेसचा, यावर तालुक्यातील नेत्यांचे महत्त्व अवलंबून राहणार आहे.

मागील वेळेचे पक्षीय बलाबल
शिवसेना- ९
राष्ट्रवादी कॉंग्रेस- ७
अपक्ष- ६
भाजप- १

नगरसेवक संख्या आता- २५
नगरसेवक संख्या मागील- २३

नगराध्यक्ष आरक्षण- सर्वसाधारण महिला

स्थानिक प्रमुख प्रश्‍न
१) वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, कचरा समस्या.
२) रस्त्यांची कामे अपूर्ण, अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद.
३) वाहनतळ, उद्यान नाही.
४) बेकायदा बांधकामे व बेकायदा नळ जोडांचे प्रमाण अधिक.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) स्मार्ट सिटी चाकण
२) वाहतूक कोंडी सोडविणार
३) पाणीपुरवठ्याची समस्या सोडवणार
४) वाहनतळ, उद्यान, भाजी मंडई करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com