चाकण औद्योगिक वसाहतीचा जगभरात ‘डंका’

चाकण औद्योगिक वसाहतीचा जगभरात ‘डंका’

Published on

हरिदास कड, चाकण

चाकण औद्योगिक वसाहतीमुळे लाखोंना रोजगार आणि परिसराचा चेहरा-मोहरा बदलला असला तरी काही समस्या आवासून उभ्या आहेत; परंतु त्या समस्यांवर मात करूनही उद्योजक कंपन्या तसेच स्थानिक नागरिक, कामगार विकासाच्या वाटेवर उभे आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीमुळे देशातीलच नव्हे तर परदेशातील ही तज्ज्ञ लोक कामगार, कर्मचारी यांना रोजगार मिळाला आहे त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीचा डंका हा जगभरात पोहोचला आहे.
अमेरिकेतील डेट्रॉईट हे मिशिगन राज्यातील एक प्रमुख शहर आहे. ज्या शहरात मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल उद्योगाची वसाहत आहे. त्याप्रमाणे चाकण औद्योगिक वसाहतही एक ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते. या औद्योगिक वसाहतीमुळे सुमारे पाच लाखावर कामगार, कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे तसेच सुमारे साडेचार हजारावर येथे कंपन्या आहेत. छोट्या मोठ्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक शेतकरी, स्थानिक नागरिक यांच्या आर्थिक विकासाला एक गती दिली आहे. चाकण औद्योगिक वसाहत ही ९० च्या दशकात वाढू लागली त्यानंतर या वसाहतीने पुढे मोठा वेग घेतला. गेली ३० वर्षांवर ही औद्योगिक वसाहत परिसरात बहरत आहे. चाकण औद्योगिक विकास महामंडळाने येथे पाच टप्प्यांत औद्योगिक वसाहत उभारली आहे. सुमारे दहा हजार एकरवर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी वापरात आणलेली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेली जमीन तसेच खासगी जमीन यावर औद्योगिक वसाहत उभारलेली आहे. औद्योगिक वसाहतीमुळे चाकण परिसरातील महाळुंगे, कुरुळी, निघोजे, शिंदे, वासुली, सावरदरी, खालुंब्रे, भांबोली, खराबवाडी, आंबेठाण, मोई, चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी व परिसराच्या गावच्या विकासाला मोठी आर्थिक चालना मिळालेली आहे. या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात दुचाकी चारचाकी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. यामध्ये बजाज ऑटो, महिंद्रा, हुंडाई, फोक्सवॅगन इतर कंपन्यांचा समावेश होतो. कंपन्यांना पुरवठा करणाऱ्या इतरही छोट्या कंपन्या आहेत, त्या मोठ्या कंपन्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांना काही उत्पादित केलेला माल, सुटेपार्ट पुरवतात त्यामुळे औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात बहरलेली असल्याने सुमारे पाच लाखावर कामगार, कर्मचारी येथे काम करतात. तसेच सुमारे साडेचार हजारावर उद्योग छोट्या, मोठ्या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या येथे कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे येथील परिसराचा विकास होत आहे.

गावांचा चेहरामोहरा बदलला
येथील औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरातील गावांचा चेहरा मोहरा बदलला. शेतीचे रूपांतर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात झाले. त्यामुळे शेती कमी झाली मग शेतकऱ्यांनी, स्थानिकांनी इतर छोटे, मोठे उद्योग सुरू केले. काही कंपन्यांना पूरक असे उद्योग, वर्कशॉप सुरू केले. काहींनी भाड्याच्या खोल्या बांधल्या. काहींनी दुकाने थाटली. काहींनी हॉटेल सुरू केली त्यातून आर्थिक विकासाला चालना मिळाली त्यामुळे शेतकरी छोटे व्यावसायिक उद्योजक झाले. त्यामुळे गावांचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला. गावचे आर्थिक उत्पन्न वाढले परिणामी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले ग्रामपंचायतीचे उत्पन्न कोट्यवधी रुपयात गेले आणि गावांचा खरा आर्थिक विकास होण्यास मोठा हातभार औद्योगिक वसाहतीमुळे मिळाला आहे.

रोजगार संधीत मोठी वाढ
औद्योगिक वसाहतीमुळे परिसरातील गावांच्या रोजगार संधीत मोठी वाढ झाली. स्थानिक तरुणांना कमी प्रमाणात रोजगार मिळत असला तरी राज्यातील तसेच देशातील विविध राज्यातून आलेला कामगार वर्ग येथे राहावयास आहे त्यामुळे भाड्याच्या खोल्यांच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे. या परिसरात सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक भाड्याच्या खोल्या आहेत, त्यातून अनेक कामगार वर्ग कर्मचारी येथे राहतो आहे. अनेक गृह प्रकल्प येथे उभारले आहेत. गृहप्रकल्पातील सदनिकांना मोठी मागणी वाढली आहे. सदनिकांच्या भावात वाढ झाली त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी येथे खोलवर पाय रोवले आहेत. तसेच जमिनीच्या खरेदी विक्री वाढून प्लॉटिंग व्यवसायाला गतीही मिळाली आहे.

छोट्या मोठ्या व्यवसायाला चालना

औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक शेतकरी स्थानिक तरुण व्यवसायाकडे वळला आहे. कोण ट्रान्स्पोर्ट व्यवसायाकडे वळला तर कोणी कंपन्यांत ठेकेदारी सुरू केली. काहींनी कंपन्यांची छोटी मोठी कामे घेतली. आता ही स्पर्धा सुरू झाली आहे. औद्योगिक वसाहतीमुळे अनेक छोटे मोठे व्यवसाय येथे नावारूपाला येत आहेत.

आर्थिक चक्राला मोठी गती
चाकण औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक परिसराच्या आर्थिक चक्राला मोठी गती मिळालेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्थानिक तरुण रोजगार ,व्यवसायाकडे वळाले आहेत .परंतु काही कंपन्यांत स्थानिक तरुणांना नोकरी मिळत नाही. हे वास्तव आहे. परंतु त्यावरही मात करून स्थानिक तरुण या विकासामुळे रोजगाराच्या संधी व्यवसायाच्या संधी शोधतात आणि व्यवसाय करतात. त्यामुळे आर्थिक उन्नती होण्यास मदत होते आहे, असे उद्योजक गणेश बोत्रे, सोमनाथ तरस यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com