पुणे-नाशिक महामार्गाची कोंडी नित्याचीच

पुणे-नाशिक महामार्गाची कोंडी नित्याचीच

Published on

चाकण, ता. ५ : अनेक वर्षांपासून चाकण परिसरातील वाहतूक कोंडी गंभीर समस्या बनली आहे. जगात औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमध्ये देश-विदेशातील अनेक मोठ्या कंपन्या आहेत. यामुळे रोज शेकडो कामगार, वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे. मात्र रस्त्यांची अपुरी रुंदी, रेंगाळलेली कामे, नियोजनाचा अभाव, वाढती लोकसंख्या, वाढती रहदारी यामुळे तासन्‌तास वाहतूक ठप्प राहत असल्याचे चित्र चाकणमध्ये नित्याचे झाले आहे.
चाकण (ता. खेड) येथे दररोज कंपन्यांच्या वेळेत, रात्री चाकण-तळेगाव, चाकण-पुणे, चाकण-भोसरी, चाकण-शिक्रापूर मार्गावर वाहनांनी कोंडी होते. वाहनांच्या पाच, दहा किलोमीटरहून अधिक रांगा लागतात. काही वेळेस पाच तासांहून अधिक काळ वाहनचालकांना अडकून राहावे लागते. याचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला बसत असून वेळेवर कामावर, घरी पोहोचणे कठीण झाले आहे. उद्योजकांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कच्चा माल वेळेवर कंपनीत पोहोचत नाही. तयार मालाच्या वाहतुकीला विलंब होतो आहे.

त्वरित उपाययोजना गरजेची
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवनही या वाहतूक कोंडीमुळे विस्कळित झाले आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून चाकणमधील प्रमुख चौक, रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र बायपास (पर्यायी मार्ग) ट्रक टर्मिनल उभारल्यास शहरातील अंतर्गत वाहतूक कमी होऊ शकते. सिग्नल यंत्रणा आधुनिक करून त्याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील अतिक्रमण, बेफिकीर वाहनचालकांवर प्रशासन, वाहतूक पोलिस विभागाने कठोर कारवाई केली पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय सक्षम केल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो. उद्योग संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, पीएमआरडीए, विविध पक्षाचे राजकीय नेते यांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केल्यासच ही समस्या सुटू शकते.

मार्गांची कामे लालफितीत
चाकण या औद्योगिक शहरासाठी वाहतूक ही केवळ सोयीची नव्हे तर आर्थिक प्रगतीची गरज आहे. योग्य निर्णय तसेच प्रभावी अंमलबजावणी झाली तर उद्योजक, कामगार, जनसामान्यांना दिलासा मिळू शकतो. पण त्या दृष्टीने कोणाचे प्रयत्न होत नाहीत. मार्गांची नव्याने कामे होत नाहीत, ती लालफितीत अडकून आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी, वाहतूक ठप्प हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे कामगार, नागरिक, उद्योजक सर्व हैराण झाले आहेत. याकडे राजकीय नेते, प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com