
वाडा येथे ‘एक गाव एक शिवजयंती’
चास, ता. २२ ः आजच्या पिढीने छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करावेत, शिवराय हे फक्त नाव नसून जगण्याची प्रेरणा व यशाचा मंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन धोरणाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कलाकार मोहन ताजणे यांनी वाडा (ता. खेड) येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
वाडा गाव व पंचक्रोशीतील युवकांनी तसेच सर्व मंडळांनी एकत्र येत एक गाव एक शिवजयंती उत्साहात साजरी केली. किल्ले शिवनेरी ते वाडा अशी चाळीस किलोमीटर दौडीने तरुणांनी शिवज्योत गावात आणली. शिवमूर्तीचे पूजन शिवराम पावडे यांच्या हस्ते तर शिवज्योतीचे पूजन उमेश वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवज्योतीसह छत्रपतींच्या पालखीची मिरवणूक पारंपारिक वाद्य व ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. मिरवणुकीचे खास आकर्षण होते ते वेताळेश्र्वर ढोल लेझीम पथक आढळवाडी, घोटवडी यांनी सुंदर सादर केलेल्या ढोल लेझीमचे विविध प्रकार तसेच मोहन ताजणे यांनी सादर केलेले दांडपट्याचे तसेच अग्निगोळे फिरवण्याचे विविध प्रकार याने उपस्थित शिवप्रेमीचीं मने जिंकली. जय जिजाऊ, जय शिवराय घोषणा देत यावेळी वाडा व परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमास सरपंच रूपाली मोरे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मोरे, अक्षय केदारी, नीलेश घनवट, पोलिस पाटील दीपक पावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दीपक पावडे, स्वप्नील हुंडारे, अमित शिंदे, गणेश भालेराव, सागर कदम, वैभव पोटभरे, राजेश सावंत, सारिश कहाणे, सुमीत शिंदे, गणेश लाडके, डॉ. रवी शेळके, सार्वजनिक शिवजयंती उत्सव वाडा यांसह अनेक शिवप्रेमींनी केले होते.