भिवेगांवला जलजीवन मिशनचे काम अपूर्णच

भिवेगांवला जलजीवन मिशनचे काम अपूर्णच

चास, ता. ४ : भिवेगांव (ता. खेड) येथे लाखो रुपये खर्चून गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाची मुदत संपली तरी काम अपूर्ण अवस्थेतच आहे. या गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. एक किलोमीटरची चढण चढून पाणी आणावे लागत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाल्याने हर घर जल योजना सद्य:स्थितीत भिवेगावात घोषणाच ठरत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ पट्यातील भिवेगांव हे डोंगराच्या मध्यभागी वसलेले शंभर टक्के आदिवासी गांव. या गावासाठी सुमारे २३,२८,५२० लक्ष रुपयांची जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना मार्च २०२१ ला मंजूर होऊन प्रत्यक्षात कामाला मार्च २०२३ ला सुरूवात झाली. तर काम पूर्ण करण्याची तारीख ७ मार्च २०२४ होती. जलजीवन योजना मंजूर होऊन काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये मोठा उत्साह होता. तशी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९९५ मध्ये पाणीयोजना झाली होती. पण त्या पाणीपुरवठा योजनेच्या टाकीला गळती लागली होती. तर अनेक ठिकाणी जुन्या वाहिनीची दुरवस्था झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला होता. पाण्यासाठी नागरिकांना सुमारे एक किलोमीटरची चढण चढत पाणी आणावे लागत असल्याने जलजीवनमुळे आता खऱ्या अर्थाने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली येणार या आनंदात महिला होत्या. मात्र या महिलांचा भ्रमनिरास झाला असून काम पूर्ण होण्याची तारीख संपून गेली तरी जलजीवन मिशनची वाहिनी अपूर्ण असून तीन महिन्यांपूर्वी वितरण टाकीचे सुरू झालेले काम फौंडेशन अवस्थेतच रखडलेले आहे. अनेक ठिकाणी वितरणची वाहिनी उघडीच असून वितरण व्यवस्थाही अपूर्णच आहे. या बाबत येथील स्थानिक नागरिक अंजना वनघरे, शांताबाई वनघरे, ढवळाबाई चिखले, चिंधाबाई वनघरे, सुमनबाई वनघरे, अंजनाबाई मेमाणे, सुरेखा वनघरे, पांडुरंग वनघरे, फसाबाई वनघरे, देवाबाई वनघरे, अलका वनघरे, सखूबाई वनघरे, सुंदराबाई दिवेकर, सुवर्णा मेमाणे, लीलाबाई वनघरे, काळुराम चिखले, सुभाष वनघरे, कांताराम दिवेकर, चिंधू वनघरे आदींनी सांगितले.

ठेकेदाराला वारंवार काम करण्याच्या सूचना दिल्या, पत्रव्यवहारही केला, शिवाय संबंधित कामाच्या ठिकाणी जाऊनही सांगितले, मात्र ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करतोय. नोटीस देऊन पुढील कारवाई केली जाईल.
व्ही. एम. बहिरट, कनिष्ठ अभियंता, जलजीवन मिशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com