‘निसर्गाच्या लहरीपणामुळे यांत्रिक शेती काळाची गरज’

‘निसर्गाच्या लहरीपणामुळे यांत्रिक शेती काळाची गरज’

Published on

चास, ता.२३ : ‘‘निसर्गाचा लहरीपणा व कमी होत असलेले मनुष्यबळ यासाठी यांत्रिक शेती काळाची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन आधुनिक शेतीची कास धरावी,’’ असे आवाहन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले.
पाडळी (ता. खेड) येथील शेतकरी मेळावा तसेच कृषी औजारे वितरण कार्यक्रमात सोमवारी (ता. २२) काळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी विभाग खेड यांच्या वतीने महाडीबीटी अंतर्गतराज्य कृषी यांत्रीकिकरण योजना सन २०२५-२६ मधील ट्रॅक्टर व स्वयंचलीत औजारे वितरण कार्यक्रम काळे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमांतर्गत आमदारांच्या हस्ते तालुक्यातील टाकळकरवाडी, चांडोली, बुट्टेवाडी, कोहिनकरवाडी, काळेचीवाडी, दोंदे, पांगरी, पाडळी, चास, कमान, चिखलगाव, मिरजेवाडी, कडधे, कान्हेवाडी या गावातील महाडीबीटी योजनेमध्ये निवड झालेल्या ४५ शेतकऱ्यांना महिंद्रा, सोनालिका, जॉन डियर, स्वराज आणि मॅसे फर्ग्युसन या कंपनीच्या ट्रॅक्टरची चावी देऊन वितरण करण्यात आले. त्याच बरोबर पेरणी यंत्र, रोटावेटर, पल्टी नांगर, बटाटा लागवड यंत्र, फणनी यांसह अन्य अवजारांचे वितरण करण्यात आले.

दरम्यान, यावेळी तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. मनरेगा फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, पॅक हाऊस इत्यादी योजनांची माहिती दिली तसेच उन्हाळी हंगामासाठी शंभर टक्के अनुदानावर भुईमूग बियाणे साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुचविले.


काही शेतकरी सरकारी योजनांपासून वंचित
शासनाच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना आहेत. मात्र कृषी विभाग त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहिला पाहिजे, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून प्रस्ताव घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सहकार्य करण्याची गरज आहे. कारण सर्वच शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतीलच असे नाही. त्यामुळे काही शेतकरी योजनांपासून वंचित राहात आहेत, असे मेळाव्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.

04171

Marathi News Esakal
www.esakal.com