अपुऱ्या सुविधांमुळे खोडद परिसरातील पशुपालक त्रस्त

अपुऱ्या सुविधांमुळे खोडद परिसरातील पशुपालक त्रस्त

Published on

खोडद, ता. १७ : अपुऱ्या सुविधांमुळे खोडद (ता. जुन्नर) येथील प्रथम श्रेणीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालक व जनावरांची मोठी गैरसोय होत आहे. शासनाने दवाखान्यात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून गैरसोय दूर करावी अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.

‘या’ सुविधांचा अभाव...
अपुरे कर्मचारी,
उपकरणांची कमतरता,
स्वच्छतागृहांचा अभाव,
पिण्याच्या पाण्याची गैरसोय,
इंटरनेटची गैरसोय

खोडद गावात प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्याची भव्य इमारत आहे. जिल्हा परिषदेने ही इमारत बांधली आहे. या दवाखान्यात डॉ. शरद लोंढे हे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात खोडद, मांजरवाडी आणि हिवरे तर्फे नारायणगाव ही तीन गावे येतात. तीनही गावांचे क्षेत्रफळ मोठे असल्याने सर्वांना सेवा देण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे.

कार्यक्षेत्रातील पशुधन संख्या
४ हजार गायी,
३ हजार ५०० शेळ्या मेंढ्या

या पशुवैद्यकीय दवाखान्याला संरक्षक भिंत नाही. दवाखान्याच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याची आवश्यकता आहे. पशुवैद्यकीय चिकित्सालयातील पशुधन पर्यवेक्षक व बहुउद्देशीय कर्मचारी (एमपी डब्ल्यू) ही दोन पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ही दोन पदे भरल्यास येथील कामात सुसूत्रता येऊन अतिरिक्त कामाचा ताण कमी होईल. या परिसरात अंधार, झाडी असल्याने सायंकाळी बिबटे या दवाखान्याच्या पायरीवर येऊन बसतात. त्यामुळे सोलर दिवे बसविण्याची गरज आहे. जनावरे वाहनातून खाली उतरवण्यासाठी जागा तयार करणे आवश्यक आहे. दैनंदिन कामाचे पत्रव्यवहार करण्यासाठी प्रिंटरची गरज आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, एक्स रे सुविधा, सोनोग्राफी अशी उपकरणे उपलब्ध करून द्यावीत. तसेच, ही उपकरणे चालविण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती व तंत्रज्ञ यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बदली ड्यूटीमुळे कर्मचाऱ्यांची कमतरता
जुन्नर पंचायत समितीचे रात्र पहारेकरी पद रिक्त असल्याने खोडद येथील परिचरांची ड्यूटी अनेक वेळा समितीमध्ये लावण्यात येते. त्यामुळे दवाखान्याच्या कामकाजावर परिणाम होऊन कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. पशुपालकांना घरपोच सेवा देण्यातही अडचणी येत आहेत.

१ एप्रिल ते १३ नोव्हेंबरपर्यंत झालेले उपचार
उपचार पद्धत.....जनावर संख्या
औषधोपचार.....६ हजार २७४
खच्चीकरण.....९४
लसीकरण.....१० हजार ८०
कृत्रिम रेतन.....३९२
शस्त्रक्रिया......१२७
वंध्यत्व तपासणी...५१७
भ्रूण प्रत्यारोपण....३ गाई (५ डिसेंबरला गायींचे भ्रूण प्रत्यारोपण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शरद लोंढे यांनी दिली.)

Marathi News Esakal
www.esakal.com