वनतारात जाणार ५० बिबटे

वनतारात जाणार ५० बिबटे

Published on

अशोक खरात : सकाळ वृत्तसेवा
खोडद, ता. १६ : जुन्नर वनविभागाच्या (जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुका) हद्दीतील गावांमध्ये एक हजार पेक्षा अधिक बिबटे आहेत. मानवी हल्ल्यांच्या घटनांनंतर जुन्नर वनविभागात ७५ बिबटे वनविभागाने पकडले आहेत, हे सर्व बिबटे माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे, यापैकी गुजरात येथील वनतारा प्राणी संग्रहालयाकडून २५ नर माद्यांच्या जोड्या म्हणजे एकूण ५० बिबट्यांची स्वीकृती आली आहे. मात्र, राहिलेल्या इतर बिबट्यांचे काय करायचे, मुक्त बिबट्यांचा बंदोबस्त नेमका कसा करायचा याबाबत काहीही आदेश किंवा सूचना न आल्याने जुन्नर वनविभाग राज्य सरकारच्या पुढील आदेशाची वाट पाहत आहे, अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खांडे यांनी दिली.
मागील सहा महिन्यांत जुन्नर वनविभागात मानव बिबट संघर्ष टोकाला गेला आहे. २४ सप्टेंबर २०२५ला जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा जीव गेला होता. त्यानंतर बिबट्यांच्या हल्ल्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी ४ लहान मुले आहेत. पिंपरखेडमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकांनी मोठ्या स्वरूपात आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने बिबट्यांच्या बाबतीत विविध घोषणा करत बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला भरीव निधी देखील जाहीर केला. जुन्नर वनविभागात पकडल्या जाणाऱ्या बिबट्यांचे गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतर करण्याचे तसेच प्रायोगिक तत्त्वावर पाच बिबट्यांची नसबंदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते.
राज्य सरकारने बिबट्यांच्या बाबतीत भूमिका जाहीर केल्यानंतर वनविभागाने बिबटे पकडण्याची मोहीम हाती घेतली आणि दीड महिन्यांत ७५ बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले. माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ४० बिबटे ठेवण्याची क्षमता आहे. या बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने पुढील काही दिवसात ही क्षमता ४० वरून ८० वर जाणार आहे. येथे बिबटे ठेवण्याची क्षमता कमी असूनही आधी पकडलेले ५० व नंतर पकडलेले ७५ असे एकूण १२५ बिबटे सध्या येथे ठेवण्यात आले आहेत.

वनतारात नवीन जागेची तयारी सुरू
वनताराकडून ५० बिबट्यांचे स्वीकृती पत्र जुन्नर वनविभागाला मिळाले आहे. सध्या वनतारामध्ये २५० ते ३०० बिबटे आहेत. जुन्नरमधील बिबट्यांसाठी नवीन जागा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्नरमधल्या ५० बिबट्यांचे स्थलांतर होणार आहे. वनताराच्या तांत्रिक टीमने जुन्नरला येऊन बिबट्यांच्या बाबतीत काही माहिती घेतली आहे. गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची देखील वनताराला जुन्नरमधील बिबट्यांच्या स्थलांतरासाठी परवानगी मिळाली आहे.

त्यांच्याकडून १२ बिबट्यांची मागणी
जुन्नर वनविभागाने देशातील ६५ प्राणी संग्रहालयांशी पत्रव्यवहार करून बिबटे स्वीकारण्याबाबत प्रस्ताव पाठवले होते, यापैकी तीन प्राणी संग्रहालयांनी १२ बिबट्यांची मागणी केली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सेंट्रल झू ॲथॉरिटी) यांच्याशी देखील जुन्नर वनविभागाने पत्रव्यवहार करून बिबटे स्वीकारण्याबाबत विचारणा केली आहे.

बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जुन्नर वनविभाग सातत्याने विविध उपाययोजना करत आहे. यासाठी वनविभागाला नागरिकांकडून देखील सहकार्य मिळत आहे. ज्या ठिकाणी उसाची शेती आहे, अशाच ठिकाणी बिबट्या आढळण्याची प्रमाण अधिक आहे, म्हणून उसाच्या शेती जवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांनी नागरिकांनी आपल्या लहान मुलांची व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. आपल्या परिसरात किंवा शेताजवळ बिबट्या आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com