
कृषी विभागाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्या : कुल
दौंड, ता. ३ : ''शेतकऱ्यांनी महाडीबीटी अंतर्गत कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,'' असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले. दौंड येथील कृषी विभागाच्या कार्यक्रमात महाडीबीटी योजनांतर्गत कृषी औजारे व ट्रॅक्टरचे वितरण आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टर चावी व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
प्रामुख्याने ट्रॅक्टर, पाचट कुट्टी यंत्र, पॉवर टिलर, रोटव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्राचा समावेश होता. तसेच कृषी विभाग अंतर्गत खरीप हंगामातील पीक स्पर्धेतील शेतकरी बांधवांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बाजरी पिकामध्ये २०२२- २३ मध्ये विक्रमी उत्पादन घेणारे अर्जुन विठोबा भोंगळे (गिरिम) - ५५०० किलोग्रॅम प्रती हेक्टर, मारुती संभाजी कोकणे (नंदादेवी) - ५४५० किलोग्रॅम प्रती हेक्टर व पुष्पा राजाराम आटोळे (रावणगाव) - ५४०० किलोग्रॅम प्रती हेक्टर यांना अनुक्रमे पाहिले तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महसूल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, ''आत्मा''चे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
02398