
मनसोबा संस्थेस शंभर टक्के वसुलीसाठी ढाल मसनोबा सहकारी संस्थेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
दौंड, ता. २१ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून दौंड तालुक्यात शंभर टक्के वसुली करिताचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तालुक्यातील मसनेरवाडी येथील मसनोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस प्रदान करण्यात आला आहे. ढालच्या स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुणे येथे पार पडलेल्या समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, बॅंकेचे अध्यक्ष डॅा. दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रमेश थोरात यांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रथम पुरस्कार म्हणून ढाल प्रदान करण्यात आली. संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, मसनोबाचे अध्यक्ष विलास जगताप, दौंड बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ जगदाळे, बॅंकेचे अधिकारी नीलेश थोरात, कर्जवाटप अधिकारी रावसाहेब कामठे, लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे, माजी उपसरपंच लालासाहेब जगदाळे, संस्थेचे संचालक, आदी या वेळी उपस्थित होते.
लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील मसनोबा संस्थेकडून मागील दहा वर्षे बॅंक पातळीवर शंभर टक्के वसुली करण्यात आली आहे. संस्थेने सभासदांना १२ टक्के लाभांश वितरित केला आहे. आगामी काळात स्वमालकीची जागा घेऊन बहुउद्देशीय व्यावसायिक इमारत उभारण्याचा मानस संस्थेचे ज्येष्ठ संचालक काशिनाथ जगदाळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सभासदांना १. ४२ कोटी रुपयांचे कर्ज
मसनोबा संस्थेची १७ मार्च १९९४ रोजी १७७ सभासद आणि ७७ हजार रुपयांचे भाग भांडवल उभारून स्थापना करण्यात आली. आजअखेर संस्थेचे ५५१ सभासद असून भागभांडवल ४६ लाख ९३ हजार ६८३ रुपये इतके आहे. संस्थेने ३१ मार्च २०२३ अखेर १ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
-----
02598