नऊ दिवसानंतर ऑनलाइन मटका अड्डा पुन्हा सुरू

नऊ दिवसानंतर ऑनलाइन मटका अड्डा पुन्हा सुरू

Published on

दौंड, ता. ४ : दौंड पोलिसांनी नऊ दिवसांपूर्वी कारवाई केलेला दाट लोकवस्ती मधील ऑनलाइन मटका जुगाराचा अड्डा पुन्हा त्याच जागेत सुरू झाला आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कारवाई नंतर देखील त्याच जागेवर जुगाराचा अड्डा सुरू झाल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलाची निष्क्रियता उघड झाली आहे.

दौंड शहरातील शालीमार चौकात देशी दारू दुकानाशेजारील परिसरात एका गाळ्यात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर २४ जून रोजी कारवाई केली होती. बुधवारी (ता. ३) हा अड्डा पुन्हा सुरू झाल्याने पोलिसांनी कारवाई करून या अड्ड्यावर मटक्याचे आकडे घेणारा अब्राहम थॅामसन दोरखंडे (वय ३१, रा. शालीमार चौक, दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन वेळी धाडी टाकून या अड्डयातून टॅब, एलईडी टेलिव्हिजन संच, ऑनलाइन जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण बारा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दौंड पोलिस, पुणे ग्रामीण पोलिस दलाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दौंड पोलिस उप अधीक्षक कार्यालय व बारामती अपर पोलिस अधीक्षक कार्यालयास ऑनलाइन व पत्त्यांचे जुगार अड्ड्यांचे मालक, सूत्रधार आणि ऑनलाइन मटका जुगार चालविणाऱ्या टोळीची माहिती आहे. तक्रारी वाढल्यानंतर अड्ड्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करून वेळ मारून नेली जाते. परंतु टोळीवर कारवाई करण्यास कोणीही धजावत नाही.

आठ महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई
शालीमार चौकातील या जुगार अड्ड्यावर ३ नोव्हेंबर २०२३, २४ जून आणि ३ जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकून अब्राहम दोरखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांविषयी भीती नसल्याने आणि ठराविकांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने नऊ दिवसांतच पुन्हा अड्डा सुरू करण्यापर्यंतची मजल अब्राहम दोरखंडे याने मारली आहे. एकाच अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली असली तरी मात्र संबंधित बीट अंमलदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.