जाधव यांच्या बदलीचा निर्णय
हिंदुत्वाला बळकटी देणार : राणे

जाधव यांच्या बदलीचा निर्णय हिंदुत्वाला बळकटी देणार : राणे

Published on

दौंड, ता. ९ : ‘‘दौंडचे पोलिस उपअधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. त्यांची बदली झाल्याने शासनाने उचललेले पाऊल योग्य अतिशय योग्य आणि हिंदुत्वाला बळकटी देणारे आहे,’’ असे विधान भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले.
स्वप्नील जाधव यांची अवघ्या तेरा महिन्यातच सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे बदली झाली आहे. केडगाव (ता. दौंड) येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमधील दोन मुलींचे बळजबरीने धर्मांतर झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना सर्व संबंधितांवर योग्य कारवाई केली नाही. पोलिसांकडून अप्रत्यक्ष पद्धतीने संस्थेला संरक्षण आणि संस्थाचालकांचे लाड केले जात असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी विधान भवनात केला होता. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई आणि स्वप्नील जाधव यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपअधीक्षक यांच्या कार्यपद्धतीविषयी आणि दौंड तालुक्यात वाढत असलेली गोहत्या, गोमांस विक्री आणि वाहतूक प्रकरणी तक्रारी झाल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीमधील अर्थकेम लॅबोरेटरी या कंपनीतून पुणे पोलिसांच्या पथकाने बाराशे कोटी रुपये मूल्य असलेला ६०० किलो मेफेड्रोन या अमलीपदार्थाचा साठा जप्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर बदलीची मागणी जोर धरत होती.
सातत्याने तक्रारी झाल्याने अवघ्या तेरा महिन्यांतच शासनाने त्यांची ३ जुलै रोजी रात्री एका आदेशाद्वारे बदली केली. ८ जुलै रोजी दौंड येथील कार्यालयात स्वप्नील जाधव यांनी नूतन उप अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्याकडे पदभार सोपविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.