पत्रकारांवरील हल्ल्याचा दौंडमध्ये निषेध
दौंड , ता. २२ : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे. दौंड येथे पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस यांच्याकडे सोमवारी ( ता. २२) एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, अभिजित सोनवणे व योगेश खरे यांच्यावर प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा निषेध करीत दौंड तालुक्यातील पत्रकारांनी हल्ला करणाऱ्या दोषींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. पत्रकार उमेश कुलकर्णी, नरेंद्र जगताप, सुमीत सोनवणे, अख्तर काझी, सचिन आव्हाड, वाजीद बागवान, संतोष जाधव, दीपक सोनवणे, गणेश सूळ, पवन साळवे, राजू जगदाळे, अलिम सय्यद, अमर परदेशी, मिलिंद शेंडगे आदी या वेळी उपस्थित होते.