बालसदनमध्ये ‘यिन’तर्फे सामाजिक जाणिवांची दिवाळी
दौंड, ता. २५ : सामाजिक जाणिवा जोपासत यंग इन्स्पिरेटर नेटवर्क (यिन) च्या पदाधिकाऱ्यांनी दौंड तालुक्यातील अविश्री बालसदन मधील विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरी केली. ही दिवाळी केवळ दिव्यांची नव्हे, तर यिनच्या पदाधिकाऱ्यांसाठी सर्जनशीलतेची उजळणी ठरली.
दौंड-कुरकुंभ-फलटण राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या अतुल कटारिया मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अविश्री बालसदनमध्ये यिनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत दिवाळी साजरी करण्यात आली. बालसदन मधील निराधार विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ देत त्यांच्या आनंदात यिनचे पदाधिकारी सहभागी झाले. बारामती येथील यिन प्रतिनिधी निसार पठाण, उपाध्यक्षा सायली गणेशकर, संग्राम गिलचे, अक्षय कळसकर, राम पडळकर, अनिकेत कांबळे, विजय कांबळे, रोनित अहिवळे, भरत पाडुळे हे या वेळी उपस्थित होते.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कल्पकतेला प्रेरणा मिळावी, हेच यिनच्या प्रत्येक उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याची माहिती पुणे यिन जिल्हाध्यक्ष स्वराज कांबळे यांनी दिली. यिनच्या सामाजिक उपक्रमामुळे मुलांमध्ये सणांविषयी आपुलकी, संस्कार आणि आत्मविश्वास वाढतो. या कार्यक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर झळकणारा निरागस आनंद सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला, असे गौरवोद्गार अविश्री बालसदनचे प्रमुख अनिल कटारिया यांनी व्यक्त केले.
बालसदन मधील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे किल्ला साकारण्याची परंपरा राखत यंदा ‘रायगड’ किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशील विचारांना आणि ऐतिहासिक जाणिवांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना यिनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

