दौंड आरोग्य केंद्र की टवाळखोरांचा अड्डा?
दौंड, ता. ३ : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले प्राथमिक आरोग्य पथक हे मद्यपी आणि टवाळखोरांचा अड्डा झाला आहे. अपुऱ्या सुविधांमुळे जेमतेम बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. दौंड पोलिस ठाण्यासमोर असलेल्या या केंद्रात दुपारी दोननंतर टोळक्यांचा धुडगूस असतो.
दौंड शहराच्या मध्यवर्ती भागातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आवारात पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य पथक आहे. सध्या त्याचे `आयुष्यमान आरोग्य मंदिर` असे नामकरण करण्यात आले आहे. पूर्वी या ठिकाणी प्रसूती होत होत्या; परंतु आता फक्त दोन तासांकरिता बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. हुतात्मा चौकाकडून पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरून केंद्रात येण्याकरिता एक फिरता गेट आहे. तर सेंट्रल बॅंकेसमोरील मुख्य प्रवेशद्वारातून केंद्रात येणे जिकिरीचे आहे. कारण प्रवेशद्वारापासून आतपर्यंत चारचाकी व दुचाकी वाहनांचा गराडा आहे. रस्त्यात लावलेली वाहने आणि विविध अडथळ्यांमुळे दिव्यांग रुग्ण केंद्रात सहज प्रवेशच करू शकणार नाही, अशी सद्यःस्थिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ आहे. संबंधित कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सोमवारी ( ता. ३) केंद्रात वेळेवर हजर होत्या. परंतु दुपारी दोन नंतर केंद्रात कोणी थांबत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे.
बाह्यरुग्ण विभागात अपुरे कर्मचारी
केंद्रात दररोज सरासरी ५० पेक्षा अधिक रुग्ण तपासले जातात. केंद्राकरिता प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, महिला आरोग्य अभ्यागत, बहुउद्देशीय आरोग्य परिचारिका, औषध निर्माता व शिपाई अशी पदे मंजूर आहेत. त्यापैकी बहुउद्देशीय परिचारिका यांना अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वर्ग करण्यात आल्याने ४ जण केंद्राचा कारभार पाहतात.
असुरक्षित व अस्वच्छ
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात सायंकाळी पाच नंतर काही टोळके राजरोस मद्यपान व गैरकृत्य करतात. आवार बंदिस्त नसल्याने विशिष्ट लोक दिवस उजाडल्यापासून आवारात ठाण मांडून आपसांत मारामारी करतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता देखील करतात. पोलिस ठाणे परिसरात नगरपालिकेचे स्वच्छतागृह नसल्याने टोळक्यासह परिसरातील काही नागरिक केंद्राच्या स्वच्छतागृहाचा वापर करताना ते इतके घाण करतात की त्यामध्ये कोणी जाऊ शकत नाहीत. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी देखील अन्यत्र जावे लागत आहे. वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी या टोळक्यास अटकाव केला तर ते अंगावर धावून जातात. नियमित स्वच्छता नसल्याने गवत उगवले असून कचऱ्याचे ढीग झाले आहेत.
केंद्रातील सुरक्षेसंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना दौंड पोलिसांकडे तक्रार देण्याचे सूचित केले आहे. प्राथमिक आरोग्य पथकाची संरक्षक भिंतीची उंची वाढविणे, पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृह व शौचालय दुरुस्ती, दारे - खिडक्या बसविणे, सांडपाणी व्यवस्था, निवासस्थान दुरुस्ती, फरशा बसविणे, प्रकाश व्यवस्था, रंगरंगोटी, आदी ११ कामांची मागणी १२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी
यांच्याकडे करण्यात आली आहे.
- डॅा. उज्ज्वल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी
याची आहे आवश्यकता
प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणीवाढ करणे
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नियुक्ती
सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली
पूर्णपणे बंदिस्त आवार
रक्त, लघवी, थुंकी तपासणी केंद्र व त्याकरिता पूर्णवेळ लॅब टेक्निशियन
पुरेसा औषध साठा
श्वानदंश प्रतिबंधक लस
सुसज्ज अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने
04179
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

