दौंडला नगराध्यक्षपदाकरिता ६ उमेदवार
दौंड, ता. २१ : दौंड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता सहा, तर २६ सदस्यपदांकरिता एकूण ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या नागरिक हित संरक्षण मंडळात मुख्य लढत होत आहे.
दौंड नगरपालिकेच्या टाउन हॅाल कार्यालयात शुक्रवारी (ता. २१) दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. जनतेतून थेट निवडून द्यावयाचे नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून, त्याकरिता नऊ महिलांनी एकूण तेरा अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सात उमेदवारी अर्ज मागे घेतले गेल्याने नगराध्यक्षपदाकरिता सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
१३ प्रभागांतून २६ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्याकरिता १२१ जणांनी १५० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. १९ व २० नोव्हेंबर रोजी दोन महिलांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. शुक्रवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६२ उमेदवारी अर्ज मागे घेतले गेल्याने ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिक हित संरक्षण मंडळाने नगराध्यक्षपदासह सदस्यपदाच्या सर्व २६ जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. महायुतीचा मुख्य घटक असलेला भाजपने निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावर सहमती न झाल्याने एकसंध पॅनेल होऊ शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नागरिक हित संरक्षण मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या काही जणांना सोबत घेत पक्षचिन्हावर उमेदवार उभे केले आहेत.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (राष्ट्रवादी काँग्रेस), मोनाली प्रमोद वीर (नागरिक हित संरक्षण मंडळ), कोमल रूपेश बंड (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), पुष्पा मनोहर कोकरे (बहुजन समाज पक्ष), सरला रवींद्र जाधव (आम आदमी पक्ष) व रूबिना करीम शेख (काँग्रेस).
नगरसेवक संख्या- २६
नगरसवेकपदासाठी पात्र एकूण अर्ज संख्या- १५०
मागे घेतलेले अर्ज संख्या- ०६४
शिल्लक एकूण अर्ज संख्या- ८६
नगराध्यक्षपदासाठी पात्र एकूण अर्ज संख्या- १३
मागे घेतलेले अर्ज संख्या- ०७
शिल्लक एकूण अर्ज संख्या- ०६
बिनविरोध - कोणीही नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

