तीन वेळा मंत्रिपद हुकले : आमदार कुल

तीन वेळा मंत्रिपद हुकले : आमदार कुल

Published on

दौंड, ता. २३ : तीन-तीन वेळा मंत्रिपद हुकण्याची वेळ आलेला राज्यातील एकमेव आमदार मी असेन. निवडून दिल्यास मंत्रिपद देण्याची घोषणा झाली; पण मंत्रिपद मिळाले नसले तरी नाराजी नाही. सर्व निर्णय मनासारखे होत नसतात, अशी खंत विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली आहे.
दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी नागरिक हित संरक्षण मंडळ पॅनेलच्या प्रचारसभेत बोलताना राहुल कुल यांनी ही खंत व्यक्त केली. पॅनेलचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया व उमेदवार या वेळी उपस्थित होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोनाली वीर यांनी या वेळी मतदानाचे आवाहन केले.
आमदार राहुल कुल म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून तर २०१९ व २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून आलो. तिन्ही वेळा पक्षप्रमुखांनी निवडून आल्यावर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला, पण मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपद हुकण्यासंबंधी माझ्यावर आलेली वेळ सभागृहात कोणावरही आलेली नसावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघासाठी दिलेल्या निधीसाठी व विविध संधीसाठी मी त्यांचा ऋणी आहे. माझे मंत्रिपद हुकल्याची माहिती असल्याने सर्व मंत्री मला अधिकचा निधी देतात. दौंड मागे राहिले ही सल दूर करायची आहे. अनुशेष मोठा आहे. पुढील तीन वर्षांत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी व्यवस्थितपणे पोचविणे, ही माझी जबाबदारी राहील. शहराचा कायापालट करण्यासाठी मताधिक्याने निवडून द्यावे.’’

कोणाशी स्पर्धा नाही
आमदार राहुल कुल यांनी दौंड शहरासाठी जेवढा निधी दिला तेवढा निधी आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी दिलेला नाही. आम्हाला कोणाशीही स्पर्धा करायची नाही. दूरदृष्टी ठेवून दौंडला राज्याच्या नकाशावर आणण्यासाठी आम्ही केलेल्या कामांवर विश्वास ठेवत मतदान करण्याचे आवाहन पॅनेलप्रमुख प्रेमसुख कटारिया यांनी केले.

4234

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com