सोनवडी येथे विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर
दौंड, ता. २३ : सोनवडी (ता. दौंड) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता योग शिबिर घेण्यात आले होते. योगाद्वारे मानसिक स्थैर्य व शारीरिक संतुलन साधण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सोनवडी येथील श्री नानासाहेब पवार माध्यमिक आश्रमशाळेत पार पडलेल्या योग शिबिरात विद्यार्थ्यांकरिता योगाचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्याकडून विविध योगासने करून घेण्यात आली. दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. आर. डी. जगताप यांनी विद्यार्थांना यावेळी मार्गदर्शन केले. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, अभ्यास कसा करावा, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात याविषयी त्यांनी नियम घालून दिले. आनंदी, सकारात्मक व तणावमुक्त जीवनासाठी मेंदू , बुद्धी, मन आणि शरीर यांच्यातील सुसंवाद किती आवश्यक आहे, यासंबंधी प्रा. जगताप यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. के. रणदिवे यांनी केले. शेलार यांनी आभार मानले.

