
महिलांनी आदर्श विचारांचा वारसा रुजविणे गरजेचे : पवार
डोर्लेवाडी, ता. २८ : ‘‘महिला सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने सक्षम असतील तर त्या स्वतःपासून स्वतःच्या कुटुंबाला नक्कीच सक्षम बनवू शकतात. आपल्या आयुष्यात आपण जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांना आदर्श मानत असतो, पण त्यांच्या विचारांचा वारसा आपण आत्मसात करत नाही. महिलांनी केवळ आदर्श नाही तर त्यांचे आदर्श विचारही कुटुंबासह समाजात रुजविणे महत्त्वाचे आहे.’’ असे प्रतिपादन शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी केले.
मळद (ता. बारामती) येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सुनंदा पवार बोलत होत्या. या वेळी ग्रामपंचायत सदस्या सारिका पिसाळ, आशा लोंढे, सुनीता सातव, सुनीता चव्हाण, मराठा सेवा संघाच्या शहर अध्यक्षा अर्चना सातव, आशा उबाळे, गौरी गावडे, रेश्मा गावडे, प्रियांका गावडे, तेजस्विनी देंडे, मानसी भोसले उपस्थित होत्या.
पवार म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे मी शारदानगर शैक्षणिक संकुलात काम करत असताना मुलींचा कायम आदर करून तिला स्व-ची जाणीव करून देण्याचे काम करत आहे. आजची युवती देशाचे उद्याचे भविष्य आहे. प्रत्येक आईने मुलांसाठी आदर्श बनले पाहिजे, त्यांच्या भविष्याची काळजी म्हणून त्यांना शैक्षणिक सक्षम बनविले पाहिजे, सामाजिक जबाबदारीची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. येणारा काळ आपल्या मुलांसाठी स्पर्धेचा आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून मुलांना संस्कारांसोबत आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षम बनवा.’’