डोर्लेवाडीत चैतन्य जप शिबिराची सांगता
डोर्लेवाडी, ता. २६ : अखंड राम नामाचा जप, पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली मिरवणूक, कीर्तन, प्रवचन, निरुपण, महाआरती, अन्नदान आदी धार्मिक कार्यक्रमाने डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे तीन दिवसीय २५ वे रौप्यमहोत्सवी चैतन्य जप प्रकल्प शिबिर पार पडले.
गोंदवलेकर महाराज चैतन्य जप प्रकल्प यांच्या वतीने शुक्रवार (ता. २४) पासून तीन दिवसीय शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी राज्यभरातून भाविक उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात आली. शनिवारी (ता. २५) अखंड जपमाळेस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर टाळ, मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर समर्थभक्त शरदबुवा रामदासी सज्जनगड, जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख, माणिक आनंदा जाधव, डोर्लेवाडीच्या सरपंच सुप्रिया नाळे, शिबिर प्रमुख मनोज नाळे, भारत गावडे, प्रशांत सातव आदी मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी शरदबुवा रामदासी यांनी मनोगत व्यक्त केले. सायंकाळी लक्ष्मण महाराज कोकाटे कण्हेरी यांचे कीर्तन झाले.
रविवारी (ता. २६) सकाळी बाळासाहेब महाराज नाळे डोर्लेवाडी यांचे प्रवचन झाले. त्यानंतर जपकारांची अध्यात्मिक व सामाजिक बांधिलकी या विषयावर चर्चासत्र पार पडले. त्यानंतर धैर्यशीलभाऊ देशमुख यांचे निरुपण झाले. यामध्ये त्यांनी रामनामाचे महत्व, गोंदवलेकर महाराज यांचे जीवन चरित्र त्यांचे कार्य, जपकारांनी करावयाचे नियम आणि साधना, सामाजिक कार्या बद्धल चिंतन मांडले. दुपारी आरती आणि महाप्रसाद झाल्यानंतर स्मिता महाराज आजेगावकर यांचे नारदीय कीर्तन झाले. त्यानंतर सामुदायिक नामस्मरण,अखंड जप माळ सांगता, श्रींची आरती आणि पसायदानाने शिबिराची सांगता झाली. सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिरही घेण्यात आले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

