डोर्लेवाडीत एकल महिलांच्या शिबिरास प्रतिसाद
डोर्लेवाडी, ता. १९ : ‘‘समाजातील एकल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणारी माझे अस्तित्व योजना यशस्वी होत आहे. महिलांनी शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेतला आहे.’’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका डॉ. शालिनी कडू यांनी केले.
जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती बारामती, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बारामती अंतर्गत ‘माझे अस्तित्व योजना, एकल महिला शिबिर’ डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे आयोजित केले होते. त्याप्रसंगी डॉ. कडू बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल झारगड, सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, तालुका वैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी देविदास सारंगकर, डोर्लेवाडीच्या सरपंच सुप्रिया नाळे, पिंपळीच्या सरपंच स्वाती ढवाण, मनीषा इंगळे, प्राची घोडे आदी उपस्थित होते.
पंचायत समिती बारामती कार्यक्षेत्रातील माझे अस्तित्व योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता व स्वेच्छेने अविवाहित आहेत अशा एकल महिलांच्या समस्या भिन्न प्रकारच्या आहेत. त्या विचारात घेऊन त्यांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करणे आवश्यक असल्याने त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिलांसाठी शिबिर घेतल्याची माहिती गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
शिबिरामध्ये बारामती हॉस्पिटल तर्फे आरोग्य तपासणी, कॅल्शियम, तपासणी, कर्करोग, मॅमोग्राफी स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. तसेच राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत बचत गटातील महिलांना समुदाय गुंतवणूक निधी व बँक कर्जाची रक्कम १ कोटी १५ लाख रकमेचे चेक वाटप करण्यात आले. यावेळी विविध योजनांसंदर्भात माहिती देणारे स्टॉल लावण्यात आलेले होते. शिबिराचा लाभ १५५६ लाभार्थ्यांनी घेतला.

