अन् क्षणात सभेची ठिकाणे सुनसान झाली...

अन् क्षणात सभेची ठिकाणे सुनसान झाली...

Published on

डोर्लेवाडी, ता. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत आज (ता. २८) चार प्रचारसभा आयोजित केल्या गेल्या होत्या. नीरावागज येथे सकाळी दहाला होणाऱ्या पहिल्या सभेची तयारीही पूर्ण झाली होती. ग्रामपंचायत इमारतीसमोर सकाळपासून उत्साही कार्यकर्त्यांची गर्दीही झाली होती. ‘दादा लवकर येणार आहेत, चला लवकर’ अशी फोनाफोनी सुरू होती. मात्र, तत्पूर्वीच अजितदादांच्या अपघाताची बातमी समजली अन् सभेसाठी गर्दीने भरलेल्या ठिकाणी स्मशानशांतता पसरली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्यात आज चार प्रचारसभा होत्या. या प्रचार सभांची कालपासूनच तयारी सुरू होती. अजितदादा हे सभेसाठी येणार असल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र, सकाळी विमान अपघाताची बातमी समजल्यानंतर पक्षाची सर्व प्रचार यंत्रणा थंडावली आणि गावोगावचे वातावरण स्तब्ध झाले.
सकाळी दहा वाजता पहिली प्रचार सभा निरावागज येथे होती. या ठिकाणी सर्व बैठक व्यवस्था, स्टेज, बॅनर वगैरे लावून तयार होते. नीरावागजला येण्यापूर्वी मळद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ होणार होता. मळदमार्गे दादा नीरावागजला जातील म्हणून कार्यकर्ते मळदमध्ये त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. नीरावागज गटात संधी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होते, तेही दादांना निवेदन देणार होते. मात्र, सभा आणि भेटी अधुऱ्याच राहिल्या.
दुपारी बारा वाजता पणदरे येथे, तीन वाजता करंजेपूल येथे व सायंकाळी साडेपाच वाजता सुपा येथे सभेचे नियोजन होते. सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचा दादांना भेटण्याचा, ऐकण्याचा, पाहण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. नाराजांची मनधरणी होणार होती. परंतु, सगळ्यांचेच स्वप्न धुळीस मिळाले. नव्या जुन्यांचा मेळ घालत, बेरजेचे राजकारण करीत तालुक्यात एकतर्फी वातावरणाची निर्मिती दादांना करायची होती. मात्र, अपघाताची माहिती कळताच प्रचारासाठी आलेले कार्यकर्ते बारामतीच्या दिशेने धावू लागले.

हरभऱ्याचा घोळाणा सुकून गेला
अजितदादांना मासे, गावरान कोंबडीचे मटण, हरभऱ्याचा घोळाणा, मेथीची भाजी, खीर असे गावरान पदार्थ आवडतात. आज प्रचारसभेच्या निमित्ताने अजित दादा वाघळवाडी येथे कार्यकर्ते सतीश सकुंडे यांच्या घरी दुपारी एकला भोजनासाठी जाणार होते. त्यामुळे सकुंडे यांनी आदल्या दिवशीच बेत आखला. सकाळीच हरभऱ्याचा घोळाणा, सेंद्रिय मेथी मागवून घेतले होते. अन्य भोजनाचीही तयारी सुरू केली होती. सकुंडे म्हणाले, सकाळी अपघाताची बातमी कळाली आणि तयारी अर्धवटच राहिली. हरभऱ्याचा घोळाणा सुकून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com