बोरीबेलच्या पाणी योजनेवरून राजकारण तापले

बोरीबेलच्या पाणी योजनेवरून राजकारण तापले

देऊळगाव राजे, ता. १० : बोरीबेल (ता. दौंड) गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंर्तगत मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वर्षा जगताप व सात सदस्यांनी केली आहे. तर, पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे आहे, असे मत सरपंच नंदकिशोर पाचपुते यांनी व्यक्त केले.
याबाबत उपसरपंच व सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या वतीने २४ जून २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये गावअंर्तगत जलजीवन मिशन योजनेतील पाणीपुरवठा योजना करण्यात येऊ नये, असे ठरविले होते. तरीही सरपंच नंदकिशोर पाचपुते व ग्रामसेवक जे. के. भांड यांनी सदस्यांना विचारात न घेता २९ जुलै रोजी बोगस मासिक सभेचा योजना करण्याचा ठराव घेऊन दिला आहे. या ठरावातील अनुमोदक उपसरपंच जगताप यांना कल्पना न देता बोगस ठरावाने मंजुरी दिली. त्यामुळे सदर योजनेला मंजुरी मिळाली आहे. तसेच, यापूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ८० लाख रुपये मंजूर होऊनही योजना आजपर्यंत अपूर्णावस्थेत आहे. योजनेला पाण्याचा स्रोत गावाजवळ एक किलोमीटरवर असताना व जिल्हा परिषदेच्या मालकीचा पाण्याचा तलाव असताना बारा किलोमीटरचा स्रोत कशासाठी निवडला आहे? त्यामुळे योजना रद्द करण्याची मागणी होत आहे.
या निवेदनावर उपसरपंच वर्षा जगताप, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गावडे, मधुकर पाचपुते, वासुदेव आवचर, सुनंदा खोमणे, स्वाती जेडगे, सुनीता शिगांडे, सुदामती लगड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सदर योजना ही गावठाण व वाड्यावस्त्यांसाठी आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे आहे. सर्व नियमानुसार ठराव केलेले आहेत. आपणावर राजकीय द्वेषापोटी आरोप केले आहेत.
- नंदकिशोर पाचपुते, सरपंच, बोरीबेल (ता. दौंड)

ग्रामसभेमध्ये गावअंर्तगत जलजीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजना न करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही सरपंच पाचपुते व ग्रामसेवक भांड यांनी परस्पर पत्र देऊन योजना होण्याबाबत ठराव दिला आहे. वास्तविक गावामध्ये पाचपुते यांच्या मागील काळात झालेली ८३ लाखांची पाणीपुरवठा योजना अद्यापही अपूर्णावस्थेत आहे.
- संभाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य, बोरीबेल (ता. दौंड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com