दौंडमधील ऊस उत्पादकांना १०० कोटींचा फटका
देऊळगाव राजे, ता. २७ : दौंड तालुक्याच्या माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी सन २०२४-२५ मध्ये उसाला प्रतिटन ३४०० ते ३४५० पर्यंत बाजारभाव जाहीर केला आहे. तर तालुक्यातील तीन साखर कारखान्यांनी तीन हजारांच्या आसपास अंतिम भाव दिला. सुमारे चारशे ते साडेचारशे रुपये कमी मिळत असल्याने सुमारे ९० ते १०० कोटी रुपयांचा फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. यामुळे उत्पादकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दौंड तालुक्यातील खासगी साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामाची तयारी करून दिवाळी अगोदर मागील गळीत हंगामातील उसाला दौंड शुगर व भीमा शुगरने तीन हजार तर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यांने तीन हजार ५० रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. तर माळेगाव सहकारी साखर कारखान्यांने ३४५० तर सोमेश्वर सहकारी साखर कारखाने ३४०० रुपयांचा मागील हंगामातील उसाला अंतिम भाव दिला आहे.
तालुक्यातून भीमा, मुळा मुठा नद्या वाहत असून, खडकवासला वितरिकेचे पाणी येत आहे. यामुळे उसाचे आगार म्हणून तालुक्याची ओळख आहे. साधारणपणे मागील गळीत हंगामात तीन साखर कारखान्यांनी तालुक्यातील उसाचे २० ते २३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. काही ऊस इतर साखर कारखाने व गुऱ्हाळाला गेला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात व कमी वाहतूक खर्चात चांगल्या साखर उताऱ्याचा ऊस साखर कारखान्यांना उपलब्ध होत आहे. तीनही साखर कारखाने साखरे बरोबर, आसवाणी, सहविजनिमिर्ती हे प्रकल्प यशस्वीपणे चालवीत आहेत. तालुक्यातील साखर कारखाने चालवणारे (पडघामागचे) प्रस्थ मोठे आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्याप्रमाणे बाजार देऊ, अशी आश्वासणे कारखानदार देत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र बाजारभावात स्पर्धा करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.
कारखान्यामध्ये मिलीजुली भगत
तालुक्यातील तीन खासगी कारखान्यामुळे ऊस दरात स्पर्धा होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु प्रत्यक्षात स्पर्धा होताना दिसत नाही. यामुळे कारखान्यामध्ये मिलीजुलीभगत होत असल्याची चर्चा आहे.
दौंड तालुक्यातील साखर कारखाने दरवर्षी शेजारील माळेगाव व सोमेश्वर कारखान्यापेक्षा ४०० ते ५०० रुपयांनी कमी ऊसदर देत आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कारखान्यांनी स्पर्धात्मक दर घावा.
- काकासाहेब गुंड, प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी, देऊळगाव राजे (ता. दौंड)

