
बुडणाऱ्या मुलांना वाचविणाऱ्या युवकांचा घोडेगाव येथे सत्कार
घोडेगाव, ता. २८ ः काळेवाडी - दरेकरवाडी (ता. आंबेगाव) येथे दोन लहान मुलांना उजव्या डिंभे कालव्याच्या पाण्यातून वाचविणाऱ्या जयेश काळे व अजय काळे या युवकांचा सत्कार प्रजासत्ताक दिनी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केला.
पार्थ रावसाहेब सोमवंशी (वय -१३, रा. घोडेगाव, खटकाळी वस्ती) हा शनिवार (ता. २१) रोजी दुपारच्या सुमारास काळेवाडी - दरेकरवाडी ते बी. डी. काळे महाविद्यालया दरम्यान असलेल्या कालव्याच्या कडेने तो व त्याचा मोठा भाऊ कृष्णा रावसाहेब सोमवंशी (वय - १६) जात असताना पार्थ हा पाय घसरून कालव्यात पडला. पार्थ याला वाचविण्यासाठी त्याच्या मोठया भावाने पाण्यात उडी मारली. दोघे भाऊ पाण्यात पडल. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहत चालले होते.
त्यावेळी जयेश दयानंद काळे व अजय दशरथ काळे (दोघे रा. काळेवाडी) दोघे मोटारसायकल वरून घरी चालले असताना त्यांनी संबंधित मुलांना कालव्यात वाहत जाताना पाहिले. त्यावेळी जयेश याने कालव्यात उडी मारली व दोन्ही मुलांना अजयच्या मदतीने बाहेर काढले. मुलांच्या पोटातील पाणी काढून दोघांनी मुलांना त्यांच्या घरी आई - वडिलांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांना समजताच त्यांनी या युवकांना प्रजासत्ताक दिनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या युवकांनी केलेल्या कामगिरीचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.