कोटमदातील सेंट्रल किचनतर्फे मुलांना निकृष्ट अन्न

कोटमदातील सेंट्रल किचनतर्फे मुलांना निकृष्ट अन्न

घोडेगाव : ता १८ : कोटमदरा (ता. आंबेगाव) येथे आदिवासी विकास विभागाने सुरू केलेल्या सेंट्रल किचनच्या पहिल्याच शनिवारी (ता.१७) विद्यार्थ्यांना अन्न निकृष्ट दर्जाचे मिळाले तर काही ठिकाणी अंबलेले अन्न मिळाले. याबाबत विविध ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या. या समस्येबाबत एसएफआय आंबेगाव तालुका समितीने प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांना उद्‌भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत येणाऱ्या खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांची भोजन व्यवस्था बंद करून आदिवासी विकास विभागाने कोटमदरा (घोडेगाव) येथे मध्यवर्ती किचन तयार केले आहे. याच किचनमधून १५ जूनपासून या तीनही तालुक्यातील आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांना भोजन तयार करून पुरविणे सुरू केले आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण, आहारात बदल, वेळेवर न देणे या समस्या भेडसावल्या आहेत. या समस्यांना घेऊन एसएफआय आंबेगाव तालुका समितीने प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, प्रकल्प अधिकारी गायकवाड म्हणाले, जेवणामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. या ठिकाणी कोणतेही आंबलेले पदार्थ नाहीत. तृटी संदर्भातील सुधारणा करण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.
निवेदन देताना सचिव समीर गारे, सहसचिव हरिदास घोडे, जनवादी महिला संघटनेच्या प्रा.स्नेहल साबळे, सुदीप विरणक, सचिन कचवा आदी उपस्थित होते.

भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता ही योजना शासनाने राबविली आहे. त्याचाच परिणाम मुलांवर होत आहे. मुलांच्या आहारात बदल केला जात आहे, निकृष्ट दर्जाचे जेवण येथून पुरविले जात आहे, हे एसएफआय खपून घेणार नाही.पुढील काही दिवसांत या समस्या सोडविल्या गेल्या नाहीत आणि परिस्थिती अशीच राहिली तर हे सेंट्रल किचन बंद करण्यासाठी एसएफआय विद्यार्थी आणि पालक वर्गाला घेऊन प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर बसेल.
- रोहिदास फलके, कोष्याध्यक्ष, एसएफआय आंबेगाव तालुका समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com