मंचर बाजार समितीत कांद्याची आवक घटली
मंचर, ता. २७ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची आवक घटल्याने भावात रविवारी (ता. २६) किंचित वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात स्थिरता होती; मात्र आवक कमी झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाल्याचे समितीचे सभापती निलेश थोरात यांनी सांगितले. बाजार समिती आवारात लाखनगाव, देवगाव, रांजणी, श्री क्षेत्र वडगाव काशिंबे, वळती, नारोडी, चास, म्हाळुंगे पडवळ, लांडेवाडी, गावडेवाडी या भागातून तसेच खेड व शिरूर तालुक्यातील काही गावातून १५ हजार २७० कांदा पिशव्यांची आवक झाली. दरम्यान बेंगलोर, बेळगाव, नवी मुंबई भागातील व्यापाऱ्यांनी येथे येऊन कांद्याची खरेदी केली.
रविवारी (ता. २६) झालेल्या व्यवहारात गोळा कांदा प्रति दहा किलोला २११ रुपये, मोठा कांदा १४० रुपये ते १८० रुपये, मध्यम कांदा १२० रुपये ते १४० रुपये, तर गुलटी कांदा ६० रुपये ते ११० रुपये दराने विकला गेला. गेल्या आठवड्यात गोळा कांद्याला प्रति दहा किलोला १४० ते १५० रुपये बाजारभाव मिळाला होता. यावेळी थोड्या प्रमाणात बाजारभाव वाढले, असे बाजार समिती उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात कांद्याचे भाव घसरलेलेच होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कांदा बराकीत साठवून ठेवला होता. मात्र, सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील अनिश्चितता यांमुळे बऱ्याच प्रमाणात कांदा सडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भाव प्रति किलोला चार ते पाच रुपये याप्रमाणे थोडेसे वाढले असले तरी सडीमुळे नुकसान मोठे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही, असे कांदा व्यापारी शामराव तावरे व बाळासाहेब बाणखेले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

