पिंपळगाव घोडेत धुमाकूळ घालणारा बिबट्या कैद
घोडेगाव, ता. २१ : पिंपळगाव घोडे, ठाकरवाडी परिसरात धुमाकूळ घालणारा अंदाजे आठ वर्षांचा नर जातीचा बिबट्या पोखरकरवाडी येथील सतीचा मोडा येथे लावलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री जेरबंद झाला, अशी माहिती घोडेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली.
पिंपळगाव घोडे( ता आंबेगाव) गावातील सतीचा मोडा येथील गोठ्यात असलेल्या सहा शेळ्यांवर १२ दिवसांपूर्वी हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने त्वरित घटनास्थळी पिंजरा लावला होता. मध्यरात्री एकाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर व वनविभागाचे पथक त्वरित घटनास्थळी येत बिबट्यास ताब्यात घेत जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले. गुजरात येथील वनतारात पाठविण्याची परवानगी मिळाल्यावर त्वरित पाठविण्यात येणार असल्याचे कुणाल लिमकर यांनी सांगितले. घटनास्थळी सरपंच सायली लाडके, उपसरपंच लक्ष्मण वागदरे, बाळासाहेब काळे, दिलीप ढमढेरे व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून वनविभागाला मदत केली.
04490

