

घोडेगाव, ता. १० : आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागेवर गेल्या ४० वर्षांपासून आदिवासी कातकरी-ठाकर बांधव राहत आहेत. त्यांना अतिक्रमित जागा खाली करण्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या डिंभे धरण विभागाने १५ दिवसांची नोटीस दिली आहे. त्यामुळे ही कुटुंबे बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश घोलप यांनी याबाबत घोलप यांनी तहसीलदारांकडे लेखी केली आहे. याबाबत ते म्हणाले, ‘‘आदिवासी बांधवांना या जागेवरून बेदखल केल्यास ती बाब अमानवीय ठरेल. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने पिंपळगाव, फुलवडे आणि शिनोली येथील बेघर कातकरी बांधवांना घरासाठी जागा मिळाली आहे. इतर भागातील बांधवांसाठीही उपाययोजना सुरू आहे. त्यामुळे या कुटुंबांना प्रशासनाने कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी घ्यावी.’’
प्रवीण पारधी म्हणाले, ‘‘याबाबत १५ डिसेंबर रोजी दुपारी ११ वाजता घोडेगाव येथील तहसीलदार कार्यालय येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यात प्रकाश घोलप यांच्यासह मारुती लोहकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. प्रशासन आदिवासी बांधवांना हक्काचा निवारा मिळवून देत नाही, तोपर्यंत त्यांना बेदखल करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे नोटीस मागे घेऊन आदिवासी बांधवांना मदत करावी.’’