घोडेगावातील नागरिकांच्या
स्मार्ट मीटरबाबत तक्रारी

घोडेगावातील नागरिकांच्या स्मार्ट मीटरबाबत तक्रारी

Published on

घोडेगाव, ता. २३ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) परिसरात वीज मंडळाच्या स्मार्ट मीटरबाबत वारंवार तक्रारी येत असून, हे मीटर जास्त रीडिंग दाखवीत आहे. सर्वसामान्य शेतकरी ग्राहक भरडून निघत आहे. हे स्मार्ट मीटर यापुढे बसविण्यात येऊ नये. याअगोदर बसविलेल्या मीटरबाबत तपासणी करून योग्य तो मीटरच बसवावा, अन्यथा याबाबत जनआंदोलन उभारू, असा इशारा माजी सभापती कैलासबुवा काळे यांनी दिला आहे.
घोडेगाव उपविभागात नऊ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यातील अनेक मीटर हे ग्राहकांना न विचारात जबरदस्तीने बसविण्यात आले आहे. या स्मार्ट मीटरचा वीज वापर रीडिंग या अगोदरच्या मीटरपेक्षा तीन ते चार पट येते. याबाबतची दखल त्याविभागाचे उपअभियंता अगर लाइनमन वेळेत घेत नसल्यामुळे ग्राहकांना याचा भुर्दंड पडत आहे. वेळेत वीज वापर बिल मिळत नसल्यामुळे अधिभार भरावा लागतो. यावर त्वरित वीज वितरण कंपनीने मार्ग काढावा अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
याबाबत घोडेगावचे उपकार्यकारी अभियंता आर. पी. भोपळे म्हणाले की, ‘‘घोडेगाव विभागात नऊ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहे, त्यांचे शंका निरसन व मीटर तपासणी करून समाधान केले जात आहे. ग्राहकांच्या तक्रारी असल्यास थेट कार्यालयात संपर्क साधावा. ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरून कंपनीला सहकार्य करावे.’’

Marathi News Esakal
www.esakal.com