विसाव्यावेळी स्थानिकांना प्राधान्य देण्याची गरज

विसाव्यावेळी स्थानिकांना प्राधान्य देण्याची गरज

गुळुंचे, ता. ७ : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी (ता. ६) नीरा (ता. पुरंदर) येथे विसावा घेऊन पुढे सातारा जिल्ह्यात मार्गस्थ झाला. मात्र, पालखी सोहळा प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेच्या मनमानीमुळे नीरा, पाडेगाव व पंचक्रोशीतील भाविकांना पादुका दर्शनाची तसेच पादुकांना नीरा स्नान घालण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. पादुकांवर डोके टेकवण्यास गेलेल्या भक्तांना पोलिस ओढून पुढे ढकलत असल्याने हजारो भाविकांची कुचंबणा होत आहे. विशेष म्हणजे पालखी स्वागतासाठी धडपडणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनादेखील हटकले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालखी सोहळा प्रशासनाच्या मर्जीनेच कारभार चालत असल्याचे दिसून आले. पालखीपूर्वी नियोजन करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी, भाविक यांना मात्र या विसाव्यावेळी प्रशासनाकडून हटकले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिकांना डावलत, हटकत पोलिस, रेस्क्यू टीम यांची मनमानी कमी करण्याबाबत पावले उचलण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचे नीरा येथे दिमाखात स्वागत केले जायचे. यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची टांगती तलवार नसल्यामुळे माऊलींच्या पादुकांचे दर्शन करून नीरा स्नान घालण्याची संधी भाविकांना मिळत असे. हळूहळू यात बदल होत गेले. दहाच्या दरम्यान नीरा येथे येणारा पालखी सोहळा आता अकराच्या दरम्यान येतो. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास नीरा स्नान उरकून सातारा जिल्ह्यात मार्गस्थ होतो. त्यामुळे विसाव्यावर अडीच ते तीन तास मिळतात. दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यातच स्थानिकांना सुरक्षा, स्वयंसेवक अशा स्वरूपाची कामगिरी न दिल्याने स्थानिकांना हटकले जात असल्याचे दिसून आले.

पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायत प्रचंड कष्ट उपसत असते. स्थानिक भाविकांना माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्याची संधी मिळत नाही. पोलिस व रेस्क्यू टीम स्थानिकांनाच हटकत असते. हे थांबायला हवे. यासाठी पुढील वर्षी सोहळा प्रमुखांशी चर्चा करणार आहे. - तेजश्री काकडे, सरपंच, नीरा शिवतक्रार

पालखी सोहळ्यात त्याच त्या लोकांना नीरा स्नान घालण्याची संधी मिळते. आजवर सोहळा समितीने अनेक बदल केले आहेत. नीरा, पाडेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना नीरा स्नान घालण्याची संधी देण्याबाबत बदल होऊ शकत नाही का?
- अमृता नितीन निगडे, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गुळुंचे

पालखी सोहळा सर्वसामान्य लोकांना समता व ममतेची शिकवण देणारा आहे. मात्र, दर्शनाच्या रांगेतून घाई करणे, भक्तांना पादुकांवर डोके टेकवण्यासाठी देखील पुरेसा वेळ दिला जात नाही. नीरा स्नान घालताना देखील प्रचंड घाई केली जाते. जो सोहळा लोक डोळे भरून पाहायला आलेले असतात तिथेच त्यांची घोर निराशा होते. यात बदल व्हायला हवा.
- प्रवीण ढावरे, ग्रामपंचायत सदस्य, पाडेगाव ता. फलटण.

विसाव्याऐवजी हवा मुक्काम
सतरा सदस्यीय ग्रामपंचायत, शेजारील गावे व वाड्या-वस्त्यांवरून येणारे हजारो भाविक, पहिलाच स्नानाचा टप्पा आणि आळंदी सोडल्यावर उपलब्ध होणारे मुबलक पाणी यांचा विचार करता नीरा येथे एक दिवस पालखी मुक्कामी राहिल्यास दर्शन व नीरा स्नानासाठी वारकऱ्यांची धावपळ व कुचंबणा होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com