‘अजित मल्टीस्टेट’चा कारभार पारदर्शक, नियमानुसारच
सासवड शहर, ता. २१ : अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेतील संबंधित कर्जदारांनी १० वर्षांपूर्वी गुळाचा व्यवसाय उभारण्यासाठी संस्थेकडून कर्ज घेतले होते. परंतु दोन वर्षांतच कर्जफेड करण्यात ते अपयशी ठरले. संस्थेच्या नियमांनुसार त्यांना १०० च्या वरती नोटिसा पाठवल्या. त्यांच्या जमिनींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक असून सहकार खात्याच्या नियमानुसारच सुरू आहे, अशी माहिती अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिली.
व्यावसायिक कर्जासाठी जमीन घाण ठेवून ही शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याला कर्ज न देता कर्जाची सुमारे ५० लाख रुपयांची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वर्ग करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना टेकवडे बोलत होते. ते म्हणाले की, कर्जदारांनी थकबाकी न भरल्याने संस्थेला जामिनदारांपर्यंत पोहोचावे लागले. या प्रक्रियेतून मार्ग काढण्यासाठी कर्जदारांनी न्यायालयाचा मार्ग अवलंबला असावा. तथापि, या संदर्भात संस्थेला न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारच्या नोटिसा मिळालेल्या नाहीत. सध्या संस्थेचा कायदा विभाग या प्रकरणाची तपासणी करीत आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक असून तो सहकार खात्याच्या नियमाप्रमाणेच सुरू आहे. संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी कर्ज देणे व वसुली नियमाप्रमाणे केली आहे. यामध्ये संस्थेला नोटीस न आल्यामुळे आमचे म्हणणे मांडता आले नाही. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात जाऊन दाद मागितली जाईल. यापूर्वी कर्जदारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती; मात्र त्यांचे म्हणणे उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संस्थेचा कारभार खूप पारदर्शकपणे चालला आहे. शनिवारी (ता. २०) संस्थेची जनरल बॉडी मीटिंग झाली. ३०-३५ टक्क्यांनी ग्रोथ असणारी ही संस्था आहे. तसेच सर्व सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे आणि संस्थेची बाजू अतिशय खंबीर आणि व्यवस्थित आहे, असे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.