सासवड येथे सेवागौरव पुरस्कारांचे वितरण

सासवड येथे सेवागौरव पुरस्कारांचे वितरण

Published on

सासवड शहर, ता. ७ : शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेचा कणा असून ते पुरस्कारांपासून कायम वंचित राहतात. त्यांनी केलेल्या कामाचे कुठेही कौतुक होत नाही, म्हणून त्यांना पुरस्कार देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी केले.
पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवंत सेवागौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोरे बोलत होते. समारंभात दत्ता कटाळे (पुणे), गुणवंत मुख्याध्यापक म्हणून अशोक वाबळे (वाघापूर), गुणवंत शिक्षक म्हणून अर्जुन शेंडगे (माळशिरस), मधुसूदन जगताप (जेजुरी), आनंदराव माने (गराडे), मेघा गायकवाड (हिवरे), गुणवंत लेखनिक म्हणून विठ्ठल मुळीक (जेऊर), अमोल दरेकर (जेजुरी), तर गुणवंत सेवक म्हणून हरीष शिवले (सासवड), हरिभाऊ गायकवाड (साकुर्डे), संतोष दोडके (काळदरी) व अनिल गायकवाड (पांगारे) यांना अशा एकूण १२ मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनीही यावेळी शिक्षकेतरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नंदकुमार सागर, गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष संदीप टिळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वरिष्ठ लेखाधिकारी संजय धिवार, कुंडलिक मेमाणे, दिलीप नेवसे, विनोद गोरे, वसंतराव ताकवले, तानाजी झेंडे, विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पांडुरंग जाधव, सोमनाथ शेंडगे, संदीप चाचर, रामचंद्र भोसले, ज्ञानदेव ठोंबरे, दत्ता शिर्के, मोहन निगडे यांनी केले होते. दत्तात्रय रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. तर, कीर्तीकुमार मेमाणे यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com