पितृशोकातही सुवर्ण कामगिरी

पितृशोकातही सुवर्ण कामगिरी
Published on

सासवड शहर, ता. ३ : एकीकडे जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील यशाचा आनंद, तर दुसरीकडे पित्याच्या निधनाचा आघात. अशा दुहेरी परिस्थितीत सापडलेल्या सासवड येथील गणेश तोटे या खेळाडूने वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी, अश्रू पुसून थेट क्रीडांगणात धाव घेतली आणि खऱ्या अर्थाने ‘खेळाडूवृत्ती’चा परिचय देत थेट सुवर्ण कामगिरी केली. दरम्यान, मंगळवारी (ता. ९) टर्की येथे होणाऱ्या आशियायी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी गणेशची निवड भारतीय संघात झाली आहे.
सासवड (ता. पुरंदर)येथील वाघिरे महाविद्यालय येथे एमए राज्यशास्त्र प्रथम वर्षातील विद्यार्थी गणेश तोटे हा आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू नुकताच रोमानिया येथे झालेल्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेऊन घरी परतला होता. वडिलांचा प्रचंड जीव असल्याने त्यांनी कर्ज काढून मुलाच्या स्पर्धा सहभागासाठी रक्कम जमा केली होती. रोमानिया येथील स्पर्धेतही दमदार कामगिरी करणाऱ्या गणेशने जागतिक क्रमवारीत आठवे स्थान प्राप्त केले. त्यामुळे घरात समाधानाचे वातावरण होते. शिक्षणासाठी सासवड येथील वाघिरे महाविद्यालय येथे असणारा गणेश रायगड जिल्ह्यातील भिंगारी इथे राहतो. सोमवारी (ता. १) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पिंपरीच्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपन्न होणार होत्या. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत इथपर्यंत पोहोचलेल्या या खेळाडूच्या वडिलांचे शनिवारी आकस्मित निधन झाले. नेमके एक दिवसाच्या अंतराने दुसऱ्याच दिवशी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होत्या. अखिल भारतीय पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सुवर्ण पदक प्राप्त करून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या या खेळाडूवर व त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा गंभीर परिस्थितीत त्याचे कुटुंबीय, त्याचे खेळाडू मित्र, त्याचे प्रशिक्षक विशाल मुळे व प्रमोद पवार यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा आग्रह केला.
महाविद्यालयाशी निगडित स्पर्धा असल्याने विशाल मुळे यांनी वाघिरे महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य जाणून प्रा. प्रीतम ओव्हाळ, श्रीकांत जगताप, प्रा.श्रीकृष्ण थेटे तातडीने त्याच्या मूळ गावी भिंगारी येथे त्याच्या घरी गेले. त्याचे योग्य प्रकारे समुपदेशन केल्याने तो दुसऱ्या दिवशी नियोजित स्पर्धेत सहभागी होण्यास तयार झाला. स्पर्धेच्या दिवशी वेळेवर स्पर्धेत सहभागी होऊन १०५ किलोग्रॅम वजन गटात स्कॉट, बेंचप्रेस व डेडलिफ्ट अशा तिन्ही प्रकारात एकूण मिळून त्याने ६३७.५ किलोग्रॅम वजन उचलले व निर्विवाद सुवर्णपदक प्राप्त केले.

...अन्‌ स्पर्धकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या
स्पर्धा संपेपर्यंत गणेश तोटेच्या बरोबर सहभागी स्पर्धकांना गणेशवर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव नव्हती. पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाल्यावर स्पर्धेस उपस्थित पंचांनी सर्व खेळाडूंना थांबवून गणेशच्या वडिलांच्या निधनाची बातमी सांगितल्यावर त्यांच्याकडून पराभूत झालेल्या स्पर्धकांच्या डोळ्यांच्या कडाही पाण्याने ओलावल्या. त्यानंतर सहभागी सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक व पंचांनी गणेशचे वडील संजय तोटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच स्पर्धेस उपस्थित सर्व खेळाडूंनी गणेशला आशियायी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व तो भारतासाठी नक्कीच सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.


2188

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com