जागा एक पट तर अतिक्रमण दहापट
इंदापूर, ता. २९ : शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कोसळल्यानंतर अनेक भागांमध्ये अतिवृष्टीच्या नावाने जलसंकट झाल्याने मोठे नुकसान होत आहे. मात्र, इंदापूर शहरातील हे जलसंकट मानवनिर्मित असून अनेकांनी ओढे, नाले, तलाव बुजवून अतिक्रमणे करीत कच्ची, पक्की बांधकामे केली आहेत. यामुळे शहरात रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप येत आहे याचा परिणाम गोरगरिबांचे हाल होत आहेत. याबाबत योग्य वेळी अतिक्रमणे रोखण्यात न आल्याने पुरासारख्या परिस्थितीत प्रशासनही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. जागा एक पट आणि अतिक्रमण दहापट अशी इंदापूर शहरातील अनेक भागात अवस्था आहे.
इंदापूर तालुक्यात मे २०२५ पासून वेळोवेळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसात इंदापूर शहरातील अनेक भागांमध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या पुरा सारख्या जल संकटाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक घरे, दुकाने, गोदामे यामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर रस्त्यांनाच ओढे, नाले यांचे स्वरूप प्राप्त होत आहे यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे जुने नाले, गटारी, पूल अक्षरशः अतिक्रमणामुळे गायब झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मुख्य इंदापूर शहरातही पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे धनदांडग्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत.
प्रशासकीय अनास्था, राजकीय वरदहस्त
शहरातील १५ नाला, जुनी तहसील कचेरी परिसर, पुणे-सोलापूर महामार्ग, मुख्य बाजारपेठ, शंभर फुटी प्रशासकीय मार्ग, कालठाण रोड, पडस्थळ रोड, शहरातील अनेक मार्ग यांची पाहणी केली तर अतिक्रमणाचे वास्तव समोर दिसते. मात्र अशा अतिक्रमणाकडे प्रशासकीय अनास्था आणि राजकीय वरदहस्त यामुळे दुर्लक्ष केले जाते आणि याचा परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिकांना पुरासारख्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते.
कागदोपत्री फेरफार दाखवून...
शहराच्या ऐतिहासिक वैभव असलेल्या मालोजीराजे गढी भोवती मोठा प्रमाणावर अतिक्रमण झाले असून आजूबाजूला मोठे ओढे, नाले होते ते बुजविले गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची आजोबांची कर्मभूमी आणि त्यांच्या कालखंडापासून जे नियोजनबद्ध दगडी नाले, दगडी पूल होते त्याच्यावर कागदोपत्री फेरफार दाखवून अक्षरशः अतिक्रमण करून मोठेमोठे इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत.
पाणी मुरण्यास जागाच नाही
इंदापूर शहरातून बाबा चौक ते आय कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अगदी बस स्थानक, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जुने कार्यालयही यासह नगरपरिषदेपासून काही अंतरावर असलेल्या जागाही अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटलेल्या नाहीत. यामुळे पावसाचे पडणारे पाणी मुरण्यास जागाच राहिली नसल्याने पुरासारखे संकट मानव निर्माण करत आहे आणि दोष मात्र निसर्गाला देत आहे. यामुळे आगामी काळात प्रशासकीय अनास्था बाजूला ठेवून जर कामकाज झाले तर निश्चितच इंदापूरकरांची पुरासारख्या जल संकटातून सुटका होईल हे निश्चित..