जेजुरीत हर आणि हरीचा जयघोष

जेजुरीत हर आणि हरीचा जयघोष

जेजुरी, ता. ४ : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी जेजुरीत विसावला. पालखीचे जेजुरी नगरीत आगमन होताच भंडारा उधळून जेजुरीकरांनी पालखीचे स्वागत केले. माउली-माउली करत वारकऱ्यांनी खंडोबाचाही जयघोष केला. हर आणि हरीच्या जयघोषात जेजुरी आज दुमदुमली होती.

सासवड येथील मुक्काम आटोपून पालखी सकाळी जेजुरीकडे मार्गस्थ झाली. साकुर्डे येथील विसावा घेतल्यानंतर वारकऱ्यांना खंडोबा मंदिर दृष्टीस पडल्यावर ‘येळकोट येळकोट जयमल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष सुरु झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखीचे जेजुरीत आगमन झाले. कडेपठार चौकात पालखीचे भंडारा उधळून
स्वागत केले. रस्त्याच्या कडेला दुतर्फा उभे राहून भाविक भंडाऱ्याची उधळण करीत होते. भंडाऱ्याने पालखी सोनेरी झाली होती. कडेपठार चौकात श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी नगरपालिका व विविध संस्थानच्यावतीने पालखीचे स्वागत केले. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त पोपटराव खोमणे, ॲड. अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, सतीश घाडगे, माजी विश्वस्त प्रसाद खंडागळे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. देवसंस्थानच्यावतीने खंडोबा लिंगावरील भंडारा व फराळाचे वाटप केले.
जेजुरी नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले व कर्मचाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी तळावर आली. समाज आरती झाल्यानंतर पालखीच्या उद्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. उद्या वाल्ह्याकडे जाताना वाहने कोळविहिरे मार्गे नेण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस पोलिस अधिकारी तानाजी बरडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक दीपक वाकचौरे आदी उपस्थित होते.
पुरंदर व्यसनमुक्त युवक संघाच्यावतीने कडेपठार चौकात जनजागृती कार्यक्रम दिवसभर सुरु होता. तुषार देशमुख, बाळासाहेब काळे, आनंदू नाईक, मच्छिंद्र नागरगोजे, प्रिन्स पासवान यांनी दिवसभर व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, जेजुरीत सकाळपासून दिंड्या येत होत्या. संपूर्ण शहर व परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. भजन, कीर्तन व हरीच्या जयघोषाने शहर दुमदुमुन गेले होते. जागोजागी अन्नदानाचे कार्यक्रम सुरु होते. खंडोबाच्या दर्शनाच्या ओढीने भाविक खंडोबा गडावर व कडेपठारावर जात होते. दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने वातावरण अल्हाददायक होते. त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता.

उच्चांकी गर्दी
यंदाच्या पालखी सोहळ्याला गेल्या चार- पाच वर्षातील उच्चांकी गर्दी दिसून आली. यंदा लवकरच पाऊस झाल्याने व शेतीच्या कामे उरकल्याने मराठवाडा, विदर्भातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसत होते. कोरोनानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी झाल्याचे अनेक वारकरी सांगत होते. दिवसभर जेजुरीत गर्दीचा ओघ सुरु होता.

तळावर नियोजनाचा अभाव
शासनाने पालखीच्या मुक्कामासाठी कडेपठार रस्त्याच्या बाजूला सुमारे नऊ एकराचा परिसर आरक्षित केला आहे. एवढी मोठी जागा असूनही नियोजन नसल्याने तळावर गोंधळ दिसत होता. समाज आरतीसाठी दिंड्यांनाच उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. सोहळ्यातील वाहने लावण्याचे नियोजन नसल्याने वारकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या.
पुढील सोहळ्यावेळी अगोदरच नियोजन व्हावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.


JEJ24B02559

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com