जेजुरीत रंगला मर्दानी दसरा
जेजुरी, ता. ३ : फटाके अन् शोभेच्या दारूची आतषबाजी, खंडोबाचा जयघोष, सनई चौघड्यांचा मंगलमय सूर, अशा उत्साही वातावरणात कडेपठारच्या डोंगररांगेतील रमणा परिसरात देवभेटीचा सोहळा गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास रंगला. कडेपठारच्या डोंगररांना जागविणाऱ्या मर्दानी दसऱ्याची शुक्रवारी (ता. ३) दुपारी बारा वाजता सांगता झाली. सुमारे सोळा तास दसरा उत्सव सुरु होता.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पेशव्यांनी इशारा देताच गडावरची पालखी उचलण्यात आली. यावेळी इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त पोपटराव खोमणे, अनिल सौंदडे, ॲड. पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, व्यवस्थापक आशिष बाठे आदी उपस्थित होते.
पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरु असताना भाविकांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण केली. भंडाऱ्यामुळे गड सोनेरी दिसत होता. मुख्य दरवाजातून पालखी सुसरटिंगी येथे आणण्यात आली. रात्री नऊ वाजता कडेपठारची पालखीचे प्रस्थान झाले. रात्री दोन वाजता कडेपठराच्या डोंगरात दोन्ही पालखीतील उत्सवमूर्तींची भेटाभेट झाली. त्यावेळी शोभेच्या दारुची आतषबाजी, आकाशात उडणारे रंगीबेरंगी फटाके, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात खंडोबाचा जयघोष करीत देवभेटीचा सोहळा रंगला. ग्रामस्थांनी एकमेकांना भेटून सोने लुटले. त्यावेळी तीन वाजता आपटा पूजन झाले. गडावरची पालखी जुनी जेजुरी मार्गे शहरात आली. तर कडेपठारची पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली.
जेजुरीत महाद्वार रस्त्यावर नागरीकांनी रांगोळी काढून व फुलांची सजावट करून पालखीचे स्वागत केले. त्यानंतर सकाळी सात वाजता पालखी गडावर आली. लोक कलावंतांनी पारंपारिक पद्धतीने पालखीपुढे हजेरी दिली. मंदिर प्रदक्षिणा देऊन उत्सवमूर्ती देवघरात ठेवण्यात आल्या. रोजमारा वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली.
खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, माजी अध्यक्ष गणेश आगलावे, सुधीर गोडसे, कृष्णा कुदळे, दीपक राऊत, काळूराम थोरात, माउली खोमणे, छबन कुदळे, दत्ता सकट, सार्थक मोरे, अविनाश सातभाई, ओम बारभाई, मयूर दिडभाई आदीं सोहळ्याचे पारंपारिक पद्धतीने नियोजन केले.
खंडा उचलण्याच्या स्पर्धेचे पंच म्हणून माजी विश्वस्त सुधीर गोडसे, खांदेकरी मानकरी मंडळ अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सोमनाथ उबाळे, नितीन राऊत यांनी नियोजन केले. प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. सोन्याचे व्यापारी फत्तेचंद रांका व सरदार पानसे यांचे वंशज यावेळी उपस्थित होते. सतीश घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
जेजुरी गडावर शुक्रवारी सकाळी आठ वाजता खंडा उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये एका हाताने तलवार उचलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश शेरे यांनी, तर कसरतीच्या व्यायाम प्रकारात नितीन कुदळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विजयी स्पर्धकांना बक्षिस रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. विजयी स्पर्धक व बक्षिस रक्कम पुढील प्रमाणे- खंडा तोलणे- प्रथम- रमेश शेरे (५१हजार), द्वितीय- अंकुश गोडसे (३५ हजार), तृतीय- हेमंत माने (२५ हजार), चतुर्थ- मंगेश चव्हाण (२०हजार), पाचवा- सुहास खोमणे व गिरीश घाडगे (१० हजार), उत्तेजनार्थ-प्रतीक खोमणे (५ हजार).खंडा कसरत- प्रथम- नितीन कुदळे (५१ हजार), द्वितीय- अक्षय गोडसे (३५ हजार), तृतीय- शिवाजी राणे (२५ हजार), चतुर्थ- शिवम कुदळे (२० हजार), पाचवा- सचिन कुदळे (१० हजार), उत्तेजनार्थ- विशाल माने व स्वप्नील शिंदे (प्रत्येकी पाच हजार).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.