जेजुरीत देवसंस्थानच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

जेजुरीत देवसंस्थानच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन

Published on

जेजुरी, ता.१५ : श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने येथील नवीन पालखी तळालगत दीड एकर जागेत राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय इमारत उभी करण्यात येत आहे. या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीमध्ये भाविकांच्या राहण्याच्या सुविधेबरोबर इतर सुविधाही असणार आहेत.
श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, अनिल सौंदडे, ॲड. विश्वास पानसे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अभिजित देवकाते, व्यवस्थापक आशिष बाठे व पुजारी सेवक वर्ग यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पौराहित्य वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक घोणे, अभियंता प्रशांत नाझरेकर, नवीन पालखीतळाशेजारी होळकर तलावालगत ही इमारत उभी राहणार आहे. ६५ हजार चौरस फूट या नियोजित इमारतीचे काम होणार आहे. यासाठी अंदाजे साडेसतरा कोटी रुपये खर्च येणार आहे. या इमारतीमध्ये वाहनतळ, संग्रहालय, कॅन्टींग, बहुउद्देशीय हॉल, मीटिंग हॉल आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे दोन वर्षांत या या इमारतीचे काम पूर्ण होईल, असे विश्वस्त मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. जेजुरी गडावरही मल्हारसृष्टी उभी करण्यात येणार आहे. त्यामध्ये खंडोबाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व शिल्प रूपाने साकारण्यात येणार आहे. त्याचेही काम सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले. या इमारतीमध्ये संग्रहालय उभारले जात असल्याने येथील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. बहुउद्देशीय हॉलमुळे छोटेमोठे कार्यक्रम येथे होतील, असे विश्वस्त मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा विरोध
नियोजित जागा मागील विश्वस्त मंडळाने तेथे अत्याधुनिक रुग्णालय उभे करण्याच्या उद्देशाने खरेदी केली होती. मात्र, सध्याच्या कार्यरत विश्वस्त मंडळाने धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या आदेशाने उद्दिष्ट बदल करीत बहुउद्देशीय इमारत व भक्तनिवास बांधण्याचा घाट घातला आहे. आचार संहिता काळात भूमिपूजन घाईघाईने उरकण्याचा घाट सध्याच्या विश्वस्त मंडळाने घातला आहे. आचार संहिता काळात भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ नये, अशा मागणीचे निवेदन जेजुरी पोलिसांना माजी विश्वस्त संदीप जगताप, सुधीर गोडसे, शिवराज झगडे व ग्रामस्थांनी दिले. त्यामुळे या नियोजित इमारतीला माजी विश्वस्त व ग्रामस्थांचा विरोध निर्माण झाला आहे. पालिका निवडणुकीनंतर ग्रामस्थांची सभा बोलवावी त्यामध्ये या जागेबाबत चर्चा व्हावी. ज्या उद्देशाने जागा घेतली त्याच उद्देशाने येथे काम व्हावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले.


03442

Marathi News Esakal
www.esakal.com