सासवड-जेजुरी मार्गावरील सीएनजी सेवा सुरळीत करा

सासवड-जेजुरी मार्गावरील सीएनजी सेवा सुरळीत करा

Published on

जेजुरी, ता. १४ : ‘‘पुणे-पंढरपूर रस्त्यावरील पुरंदर तालुक्यातील सासवड ते जेजुरी या महामार्गावरील दोन सीएनजी पंप बंद आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांचे हाल होत आहेत. पुरंदर तालुक्यातील नागरिक व भाविकांना सीएनजी भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. महामार्गावरील सीएनजी पुरवठा सुरळीत करावा,’’ अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील जेजुरी शहरातील व सासवड जवळील गोटेमाळ येथील सीएनजी पंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. सीएनजी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या दोन्ही पंपांवर अवलंबून असलेली वाहने सध्या सासवड शहरातील सीएनजी पंपावर इंधन भरण्यास येत असल्याने तेथे दिवस-रात्र प्रचंड गर्दी होत आहे. जेजुरीकरांना मोरगाव अथवा अन्यत्र सीएजी पंप शोधावा लागत आहे. सासवड शहरातील सीएनजी पंपही अनेक वेळा ऑनलाइन नसल्याने पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आवश्यक सीएनजी मिळण्यास वाहनचालकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
जेजुरी हे तीर्थक्षेत्र असल्याने राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक येथे येतात. जेजुरी नजीक औद्योगिक वसाहतही आहे, तसेच पुणे पंढरपूर महामार्गावरील वाहतूक वाढली आहे.
दोन्ही सीएनजी पंप बंद असल्याने खासगी वाहने, टॅक्सी, रिक्षा तसेच प्रवासी, नोकरदार व मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या उद्देशाने शासनाने सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या सीएनजी पंपांची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेली नाही. पुरंदर तालुक्यातील उपलब्ध असलेले हे दोन्ही पंप दीर्घकाळ बंद राहणे हे अत्यंत गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना लांब अंतर कापून सासवड किंवा पुणे येथे जाऊन इंधन भरावे लागत असून वेळ, इंधन व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
महामार्गावरील इंधन सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी सीएनजी वाहनचालक, स्थानिक नागरिक व भाविकांकडून होत आहे. शासन व संबंधित तेल कंपन्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com